दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीच्या घनदाट जंगलात संशोधक संजय सावंत यांनी ‘बोसेनबर्गिया टिलीफोलिया’ (Boesenbergia tiliifolia) या अत्यंत दुर्मिळ औषधी वनस्पतीचा प्रथमच शोध लावला आहे. महाराष्ट्रात या वनस्पतीची ही पहिली अधिकृत नोंद असून, तिची नोंद ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे.
या वनस्पतीची शास्त्रीय ओळख वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विजय पैठणे व डॉ. अनिल भुक्तार यांनी निश्चित केली. श्री. सावंत यांच्या या शोधामुळे तिलारी खोर्याच्या जैवविविधतेत आणखी एका अनमोल प्रजातीची भर पडली आहे.
Zingiberaceae म्हणजेच आले कुळातील ‘बोसेनबर्गिया टिलीफोलिया’ ही वनस्पती सामान्यतः पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये आढळते. स्थानिक भाषेत तिला ‘कचूर’ किंवा ‘कपूरकचारी’ असे म्हणतात. या वनस्पतीमध्ये विविध औषधी गुणधर्म असून पारंपरिक औषधांमध्ये व पाककृतींमध्ये तिचा वापर केला जातो. संजय सावंत हे ‘वनश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या माध्यमातून जैवविविधता संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष निवारण व संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या दीर्घकालीन निरीक्षण, निसर्गप्रेम व तळमळीमुळेच ही दुर्मीळ वनस्पती शोधणे शक्य झाले.
डॉ. विजय पैठणे आणि डॉ. अनिल भुक्तार यांच्या वैज्ञानिक सहकार्यामुळे या वनस्पतीची अचूक शास्त्रीय ओळख पटली. हा शोध केवळ एक नवीन नोंद नसून, तिलारी खोर्यातील जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आले कुळातील वनस्पती
प्रामुख्याने केरळ, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये आढळते
स्थानिक भाषेत ‘कचूर’ किंवा ‘कपूरकचारी’नावाने ओळख
संशोधनाची नोंद ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध
‘बोसेनबर्गिया टिलीफोलिया’सारख्या वनस्पतींचा शोध केवळ जैवविविधतेच नव्हे, तर औषधनिर्मितीच्या संशोधनालाही दिशा देतो. या वनस्पतीच्या औषधी उपयोगांवर आणि स्थानिक स्तरावर तिच्या संवर्धनावर आणखी संशोधन करण्याची आवश्यकता आहे.