मालवण : राजकोट किल्ला आणि शिवपुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. राजकोट किल्ला येथे अद्यापही काही दुरुस्त्या आणि विकासकामे सुरुच आहेत. तटबंदीही बर्याच प्रमाणात दुरुस्त करण्यात आली होती. अनेक ठिकाणी स्टील रेलिंग करण्यात आल्याचे दिसत आहे. तरीही पर्यटन हंगामात किल्ला बंद ठेवणे योग्य नसल्याने प्रशासनाने राजकोट किल्ला खुला केला आहे.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतर्याच्या सभोवतालच्या पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत 22 जूनपासून पर्यटकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला होता.
पावसाळ्यात किल्ले सिंधुदुर्ग बंद केल्यानंतर राजकोट किल्ला आणि शिवपुतळा पर्यटकांसाठी आकर्षण होते. मात्र, चबुतर्याचा काही भाग खचल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी राजकोट किल्लाच बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर गेले दोन महिने चबुतर्याच्या सभोवती असलेल्या पथपथाची दुरुस्ती केली असून आता पुन्हा राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
1 सप्टेंबरपासून अधिकृतरित्या पर्यटन हंगाम सुरू झालेला असताना किल्ले सिंधुदुर्ग दर्शन होडीसेवा अद्याप सुरू झालेली नाही. पण आता किल्ला सुरु केल्यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन थेट घेता येत आहे.