राजकोट : पुतळ्याच्या आतमध्ये तो उभा राहण्यासाठी हे लोखंड वापरले. त्यामधील नटबोल्ट तुटून गेल्याचे दिसत आहे. Pudhari File Photo
सिंधुदुर्ग

पुतळा ब्राँझचा की पितळेचा, हाच संशय!

पुढारी वृत्तसेवा
गणेश जेठे

राजकोट : राजकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताना खरेच ब्राँझ धातू वापरला का? ब्राँझ या मिश्र धातूसोबत शिसे, जस्त असे पंचधातू मिश्र केले का? की पितळेचाच जास्त वापर झाला याबाबत शिवप्रेमी आणि शिल्पतज्ज्ञांनीही संशय व्यक्त केला आहे. तपासी यंत्रणांनी तर हे शोधण्यासाठी कंबर कसली असून फॉरेन्सिक विभागाच्या अहवालाची उत्कंठा ताणली गेली आहे. केवळ 24 वर्षे वयाच्या अननुभवी शिल्पकाराने एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली खरी; परंतु त्याला अनुभव नसल्याने या पुतळ्याचा ‘वेट बॅलन्स’ सांभाळता आला नाही, असे आता पुढे आले आहे.

राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांतील भेटी, पाहणी आणि आंदोलने आता मंदावली आहेत. आता सर्वांचेच लक्ष तपास यंत्रणांकडे लागले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे पुतळा कसा बनवला, त्यासाठी कोणत्या धातूचा वापर करण्यात आला, आतील लोखंडाचा वापर किती आणि कसा केला? आतून, बाहेरून दोन्ही बाजूने कास्टिंग पार्टला वेल्डिंग केले का, या प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणा तज्ज्ञांच्या मदतीने शोधत आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या अधिकार्‍यांनी दोनवेळा राजकोटवर येऊन कोसळलेल्या पुतळ्याच्या अवयवांचे काही नमुने गोळा करून नेले आहेत. कास्टिंगसाठी वापरलेला धातू, पुतळ्याच्या आत वापरलेल्या आयबीमचे नमुने, नटबोल्टचे नमुने, वेल्डिंगसाठी वापरलेले मटेरियल याची तपासणी फॉरेन्सिक लॅबकडून होणार आहे. त्यामुळे या अहवालाची प्रतीक्षा पोलिस यंत्रणेला आहेच. या अहवालातून हे स्पष्ट होणार आहे की, हा पुतळा बसविल्यानंतर तो पंचधातूचा पुतळा असल्याचे शिल्पकाराने जाहीर केले होते त्याप्रमाणे तो होता का?

खरेच पंचधातू वापरला का?

जगभरातले बहुतांशी पुतळे ब्राँझ धातूने बनविले जातात. इथे पंचधातूचा वापर झाल्याचे म्हटले होते. तांबे आणि कथिलचे मिश्रण केले की ब्राँझ हा मिश्रधातू तयार होतो. यात 80 टक्के तांबे, त्यात शिसे, जस्त अशा धातूंचा वापर केला की त्याला पंचधातू संबोधले जाते. काहीवेळा पितळेचा वापरही ‘सोय’ म्हणून केला जातो. इथे खरेच पंचधातू वापरला गेला की पितळेचा वापर केला गेला याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यात पुन्हा अनेकांचे असे म्हणणे आहे की जेव्हा प्रत्यक्षात पुतळा उभारला गेला तेव्हाचा पुतळ्याचा रंग आणि जेव्हा पुतळा कोसळला तेव्हाचा रंग यामध्ये काहीसा बदल दिसत होता. आता याबाबतचा नेमका अहवाल फॉरेन्सिक विभागच सरकारला सादर करणार आहे.

जयदीप आपटे लवकरात लवकर हवा आहे

नौदलाने पुतळा उभारण्याची वर्कऑर्डर शिल्पकार जयदीप आपटे याच्या कंपनीला दिली होती आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची जबाबदारी चेतन पाटीलकडे होती. त्यामुळे पुतळ्याचे बाह्य रूप आणि अंतर्गत मजबुतीचे काम या दोन्ही जबाबदार्‍या या दोघांच्याही होत्या. परंतु त्या गांभीर्याने पाळल्या गेल्या नाहीत हे आता पुढे आले आहे. म्हणूनच दोघांनी संगनमताने निकृष्ट काम केले, अशी फिर्याद सार्वजनिक बांधकाम विभागाने मालवण पोलिसात नोंदवली आहे. चेतन पाटील पोलिसांना सापडला आहेच; परंतु जयदीप आपटे हा महत्त्वाचा आरोपी लवकरात लवकर पोलिसांना हवा आहे. कारण अनेक प्रश्नांची उत्तरे जयदीप आपटे याच्याकडे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT