कणकवली : ठाणे-मुंबईहून मेंगलोर एक्स्प्रेसने कणकवली असा प्रवास करणारे कुंभवडे येथील शंकर रामचंद्र तावडे (सध्या रा. डोंबिवली) यांच्या बॅगेतील पॉकेटमधून साडेपाच हजाराची रोख रक्कम चोरणारा नितीश शेट्टी (31, सध्या रा. अंबरनाथ) याला 10 जुलै रोजी रेल्वे आणि कणकवली पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. त्याच्याकडून चोरलेली रोख रक्कम आणि आयफोनसह चार मोबाईल हस्तगत करण्यात आले होते.
त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने कणकवली न्यायालयाने त्याला पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
संशयित नितीश शेट्टी याला पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे व पोलिस कॉ. स्वप्निल कदम यांनी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात हजर केले. संशयित नितीश शेट्टी याच्याकडे आयफोनसह काही मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे अन्य चोरी प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.