नांदगाव : जिल्ह्यात मे महिन्यातच पाऊसाने दमदार सुरवात केल्याने यावेळी भात पेरण्याही सुमारे 10 ते 15 दिवस अगोदर झाल्या. यामुळे बळीराजा सुखावला असून जूनमध्येच भातशेती कामांना वेग आला आहे. सध्या पाऊसही समाधानकारक पडत असल्याने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील भात लावणी सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांचे भात हे मुख्य पीक आहे. यंदा मे महिन्यात पाऊस सुरू झाल्याने काही शेतकर्यांनी 18 ते 20 मे दरम्यान भात पेरणी पेरणी केली. तर काही शेतकर्यांनी मृग नक्षत्राच्या मूहुर्तावर पेरणी केली. आता मे महिन्यात झालेल्या पेरणीची रोपे लावणी योग्य झाली आहेत. सुदैवाने पाऊसही लावणीकामासाठी योग्य आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातील भात लावणी सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र आहे.
येत्या चार- पाच दिवसात दुसर्या टप्प्यात पेरणी केलेल्या भाताची लावणी सुरू होईल. पावसाने अशीच साथ दिल्यास जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात किमान 70 ते 80 टक्के भात लावणी पूर्ण होईल, अशी शेतकर्यांना आशा आहे. मान्सून सध्यस्थितीत भात पीकास योग्य असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. भात लावणी आटोपताचा शेतकरी नाचणी व भूईमूग लागवडीच्या कामांकडे वळणार आहेत.