मडुरा : मडुरा, कास व सातोसे परिसरातील शेतकर्यांवर गेल्या चार दिवसांपासून ओंकार हत्तीचे संकट कोसळले आहे. या काळात हत्तीने शेतातील उभ्या पिकांची प्रचंड नासधूस केली असून, शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास पायाखाली तुडवला जात आहे. ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाचे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. केवळ फटाके लावणे आणि पाळत ठेवणे एवढ्यापुरतीच विभागाची कार्यवाही मर्यादित असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
मंगळवारी ग्रामस्थांनी मडुरा काळाआंबा येथे एकत्र येत वन अधिकार्यांना घेराव घातला. आमची शेती, आमचं उपजीविकेचं साधन उद्ध्वस्त होत आहे. आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, कास तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबू पंडित यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी हजर होते.
गोवा-तांबोसे येथे ओमकार हत्ती आला होता त्यावेळी गोवा राज्याचे वनमंत्री तसेच मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणी लक्ष ठेवून होते. मात्र स्थानिक आ. दीपक केसरकर यांनी अजूनही घटनास्थळाला भेट दिली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आपल्या भागातील जनतेच्या अडचणींची स्थानिक आमदार दखल घेत नाहीत, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रासरूटवरील वन कर्मचारी आपापल्या परीने हत्तीवर लक्ष ठेवून आहेत; परंतु वरिष्ठ पातळीवरून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. हत्तीच्या मुक्त वावरामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनमंत्र्यांनी याची दखल घेऊन या हत्तीचा बंदोबस्त करावा. अन्यथा ग्रामस्थ कठोर आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिला.
‘ओंकार’ हत्तीमुळे उद्भवलेले हे संकट केवळ शेतकर्यांच्या उपजीविकेला नाही, तर त्यांच्या सुरक्षेलाही धोका पोहोचवत आहे. ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी.प्रवीण पंडित, सरपंच, कास ग्रा. पं.