

शंकर कोराणे
दुकानवाड : गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त नाना प्रकारची विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेश चतुर्थी साजरी करण्याच्या जुन्या पद्धतीने आपले रूप पूर्णपणे बदललेले असून त्यात आधुनिकतेने एन्ट्री केली आहे. यात काही गोष्टी ‘गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी’ या वाक्यात बंदिस्त झाल्या आहेत. या धकाधकीच्या जीवनात आपल्या हातून निसटून गेलेल्या काही गोष्टींचे त्यानिमित्त केलेले स्मरण करणे गरजेचे आहे.
गरज ही शोधाची जननी आहे, या उक्तीनुसार मानवाने अंधारावर मात करण्यासाठी प्रकाश देणार्या साधनांची निर्मिती केली. त्यात सर्वसामान्यापासून उच्चभ्रू लोकांपर्यंतच्या जीवनात शेकडो वर्ष अविरत सेवा केलेल्या चिमणी (दिवा), कंदील आणि बत्ती या त्रिमूर्तीचा नंबर खूप वरचा लागतो. आत्तापर्यंत कैक पिढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रकाश मिळवण्यासाठी त्यांचा वापर करत आल्या. भले आज नाना प्रकारच्या रंगीत दिव्यांचा आणि हॅलोजन बल्बचा झगमगाट सुरू झालेला असेल, रात्रीच्या काळोखात कृत्रिम पद्धतीने दिवसा सारखा प्रकाश निर्माण केला जात असेल, सर्व प्रकारचे क्रीडा सामने, कार्यक्रम रात्री प्रकाशझोतात खेळवले जात असतील, पण शेकडो वर्ष प्रतिकूल परिस्थितीत या त्रिमूर्तीने, मानव जातीसाठी केलेल्या सेवेला तोड नाही. अलीकडे बदलत्या जीवनशैलीनुसार त्यांचा वापर कमी कमी होताना दिसत होता, पण गेल्या सात-आठ वर्षांत तर ही साधने केवळ अदृश्य नव्हे तर कधी कालबाह्य झाली हे समजलेच नाही.
सूर्य मावळतीला गेल्यानंतर येणार्या अंधाररूपी साम्राज्यावर मात करण्यासाठी चिमणी, कंदील व बत्ती या त्रिकूटाने कित्येक वर्षे मानव जातीची सेवा बजावली. अर्थात प्रकाश देणार्या वस्तूरुपी साधनांमध्ये अनेक प्रतिकृती मानवाने तयार केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने कंदील व बत्ती यांचाही रोल अडीअडचणीच्या काळात किंवा सण समारंभाच्या दरम्यान अतिशय मोलाचा असायचा. मात्र चिमणीचा (दिव्याचा) वापर दैनंदिन व्यवहारामध्ये सतत असायचा. मानवाने चिमणीला तर घरच्या लक्ष्मीची उपमा दिली होती. कंदीलाचा वापर घराला लागून असलेली पडवी, गुरांचा गोठा अगर मांगराकडे तसेच प्रसंगी शेतीकडे जाताना व्हायचा. रात्रीच्या वेळी बैलगाडीने प्रवास करताना कंदील गाडीच्या लाकडी घोड्याला दिशादर्शक म्हणून लटकवत बांधलेला असायचा. बतीचा रुबाब तर फारच होता. कंदीलाचा प्रकाश लालसर तर बत्तीचा पांढरा शुभ्र प्रकाश लोकांना आकर्षित करायचा. तिचा वापर सणसमारंभ, उत्सव, जत्रा, लग्न समारंभाच्या काळात आवर्जून व्हायचा. एखाद्या घरात बत्ती प्रज्वलित होणे प्रतिष्ठेचे मानले जाई. लग्नात नवरीपेक्षा बर्याच जणांच्या नजरा करवलीकडे जायच्या, तशी बत्ती सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायची.
या त्रिकूटामध्ये सर्वात प्रथम चिमणीचा वापर सुरू झाला. खरोखरच तिचा शोध लागला तेव्हा किती आनंद वाटला असेल तत्कालीन मानव जातीला! अलीकडच्या काळात प्रकाश निर्मिती करणार्या प्रकारात अक्षरशः चढाओढ लागली आहे. जल विद्युत, औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, त्यावर आधारित अनेक प्रकारचे बल्ब, ट्यूबलाईटस्, हॅलोजन, लहान दिव्यांच्या रंगीबेरंगी माळा आल्या. सर्वत्र झगमगाट सुरू झाला. हातात सेलच्या तसेच चार्जिंगच्या बॅटरी आल्या, वीज अनपेक्षित गेली तर इन्व्हर्टरचा वापर सुरू झाला. ही सर्व आधुनिक शोधाची देन आहे. यावरून एक गोष्ट कळून येते की या जगात नव्या रूपात, कमी वेळात, कमी खर्चात उपयोगी पडणार्या वस्तू अथवा साधने जन्माला आली की जुन्या वस्तूंचा संग्रह कालबाह्य ठरतो. दुर्दैवाने अंधारात चाचपडणार्या मानवाची सेवा केलेल्या या त्रिमूर्तीला त्यांच्या अस्तित्वाचा त्याग आमच्या डोळ्या देखत करावा लागला ही खंत नेहमीच सलत राहील. अर्थात गरज सरो आणि वैद्य मरो या मानवाच्या कटू नीतीला ही साधने बळी पडली म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
दरम्यान क्रूड ऑईल या कच्या खनिज तेलाचा शोध लागला. त्यावर रिफायनरीद्वारे पेट्रोल, डिझेल आणि केरोसीन या ज्वालाग्रही तेलांची निर्मिती झाली. पेट्रोलवर स्वयंचलित वाहने, विमाने धाऊ लागली. डिझेलवरती ट्रक, एस टी. बसेस आणि पाणी उपसा करणारी इंजिन सुरू झाली तर केरोसीनवर चालणार्या चिमणी, कंदील व बत्ती या त्रिकूटाने अंधारात प्रकाश देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. चिमणी घरात, कंदील दारात अन् बत्ती सणसमारंभात हे समीकरण तयार झाले. काल परवा पर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण जेव्हापासून प्रकाश देणार्या इतर पर्यायी योजना जन्माला आल्या तेव्हापासून या साधनांच्या वापराला उतरती कळा लागली. केरोसीनचा वापर किचन मध्ये स्टोव्ह व हेगडी प्रज्वलित करण्यासाठी शेकडो वर्ष करण्यात आला. त्यानंतर गॅस सिलेंडरचा किचन रूममध्ये शिरकाव झाला. सुरुवातीला फक्त नोकरदार आणि श्रीमंत घरामध्ये मिरवणारा गॅस सिलेंडरनंतर आता सर्वसामान्यांच्या घराघरातील स्वयंपाक घरांचे अविभाज्य अंग बनला. घरात लाईट गेली तर इन्व्हर्टर, दारात सौर ऊर्जेचे बल्ब, हातात दूरवर प्रकाशझोत टाकणार्या बॅटर्या यामुळे केरोसीनचा वापर हळूहळू कमी होऊ लागला.
खरेतर क्रूड ऑईलपासून निर्माण होणारे पेट्रोल आणि डिझेल हे दोन ज्वालाग्रही बंधू जिवंत आहेत, म्हटल्यानंतर त्यांच्या साथीला केरोसीन असणारच. कारण ती क्रूड ऑईल नावाच्या एकाच आईची लेकरे आहेत. उत्पादन भरपूर पण मागणी कमी असेल तर खर्या अर्थाने त्या वस्तूचे बाजारात दर कमी झाले पाहिजेत. मात्र केरोसीनच्या बाबतीत हे चित्र विरोधाभास दाखवते. 1990-91 च्या दरम्यान केरोसीनचा प्रतिलिटर दर सव्वा रु. च्या आसपास तर पेट्रोल 30 ते 40 रु. प्रति लिटर आणि डिझेल 17 ते 18 रु. प्रति लिटर होते. सध्या डिझेल व पेट्रोलची मागणी तर खूपच आहे. त्यामुळे त्यांचे दर वाढणे अपेक्षितच होते. मात्र केरोसीनची मागणी कमी झालेली असतानाही दर शंभर रुपये प्रति लिटरच्या घरात कसे गेले याचं कोडे सुटत नाही.
पूर्वीपासून मानव प्रकाशासाठी वनस्पतीच्या तेलावर चालणार्या साधनांचा वापर करत आला. त्यात प्रामुख्याने काकडा, टेंबा, पलिता, बोळा, दिवटी, टवळी, मशाल, हिलाळ, ठावके, आरती, पणती आदींचा उल्लेख करावा लागतो. चारशे वर्षांपूर्वी, स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी आपले उभे आयुष्य स्वतःच्या राहत्या घराबाहेर घालवले. गड किल्ल्यांच्याकडे जाणार्या अंधार वाटा शोधण्यासाठी याच साधनांचा वापर केला जात होता.
असो, घरात प्रकाश देणार्या अनेक साधनांची निर्मिती झाली, सण समारंभात विविध रंगांच्या बल्बचा झगमगाट सुरू झाला. प्रतिकूल परिस्थितीत ही सेवा बजावलेल्या चिमणी (दिवा), कंदील आणि बत्ती यात्रिमूर्तीचा मात्र काळाच्या ओघात अस्त झाला. विद्यमान तरुण पिढीला त्याचं महत्त्व कळणार नाही. मात्र पूर्वजांनी अंधारावर कशाप्रकारे मात केली तो इतिहास विस्मरणात जाता कामा नये म्हणून या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.