दोडामार्ग भाजपमधील जुना संघर्ष पुन्हा उफाळला File Photo
सिंधुदुर्ग

Dodamarg BJP internal conflict | दोडामार्ग भाजपमधील जुना संघर्ष पुन्हा उफाळला

प्रारूप आराखड्याच्या मागून गटातटाचे राजकारण ; वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतीत भाजपा गोटात आलबेल नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे भाजपचे दोन मातब्बर चेहरे, विद्यमान नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. त्यामुळे वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दोडामार्ग शहर प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतीवरील सुनावणीबाबत नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंगळवारी विशेष सभा आयोजित केली होती. त्या सभेत आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये झालेली शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरला. सार्वजनिक बैठकीतच या दोघांनी एकमेकांवर आरोपांची फैरी झाडल्या. परिणामी शाब्दिक चकमक उडाली आणि मजल लायकी काढण्यापर्यंत गेली. त्यातूनच पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. शहर प्रारूप विकास आराखड्यावरून निर्माण या संघर्षामुळे भाजपाच्या स्थानिक गोटातील राजकीय कलह पुन्हा उफाठून आला आहे.

शहर भाजपामध्ये दोन गट असल्याच्या चर्चांना यामुळे पुन्हा बळ मिळाले आहे. चेतन चव्हाण समर्थक आणि संतोष नानचे समर्थक असे दोन गट नगरपंचायतीत सक्रिय असल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवू लागले. शहर प्रारूप विकास आराखडा आपण पूर्वीच रद्द करण्याबाबत सुचविले असल्याचे नगरसेवक संतोष नानचे यांनी सांगत सभात्याग केला.

दरम्यान, समजून उमजून बोलण्याचे नगराध्यक्ष चव्हाण यांनी नगरसेवक नानचे यांना सुनावले. त्यामुळे यापैकी प्रत्येकजण आपला वचक वाढवण्यासाठी दुसर्‍याच्या पायावर पाय ठेवायला मागेपुढे पाहत नसल्याची चर्चा आहे.

वरिष्ठांना पुन्हा डोकेदुखी 

या सार्‍या प्रकरणामुळे भाजपा जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेतृत्वापुढे संकट उभे राहिले आहे. येत्या वर्षभरात नगरपंचायत निवडणूक होणार असताना, अशी अंतर्गत फूट पक्षासाठी ‘आत्मघातकी’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर या अंतर्गत वादात पक्ष नेतृत्वाने जर वेळेवर हस्तक्षेप केला नाही, तर हा अंतर्गत कलह भाजपाच्या वरिष्ठांसाठी पुन्हा डोकेदुखी ठरणार आहे.

वरिष्ठ शिस्तीचा चाबूक दाखवणार का?

चेतन चव्हाण व संतोष नानचे हे दोघेही आपापल्या गटांमध्ये प्रभावशाली आहेत. भाजपच्या ‘शिस्तप्रिय’ आणि ‘संघटित’ पक्ष रचनेला अशा प्रकारच्या अंतर्गत वादातून गळती लागल्यास, त्याचा फटका येथील संघटनेला बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वरिष्ठ नेतृत्व आता या दोघांनाही शिस्तीचा चाबूक दाखवणार का? की ही धुसफूस डोळ्यादेखत वाढू दिली जाणार? असा सवाल सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT