नांदगाव : वृद्धाश्रमातील आजी -आजोबांना ते शाळेत असतानाचे ते दिवस पुन्हा अनुभवता यावेत, ते खेळ, ती दंगा मस्ती करता यावी, यासाठी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील ‘आजी-आजोबांसाठी बालवाडी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बालवाडीत आजी-आजोबा पुन्हा एकदा रमले.
या उपक्रमाचा शुभारंभ असलदे बालवाडीच्या शिक्षिका उज्ज्वला लोके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. वृद्धापकाळ म्हणजे दुसरे बालपण असते. याच बालपणात शाळेत अनुभवायचे दिवस या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना पुन्हा अनुभवता यावेत यासाठीच ‘आजी-आजोबांची बालवाडी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपल्या लहानपणीचा बालवाडीचा पहिला दिवस ते बालवाडीतील अनेक गीते, नृत्य आणि मज्जा सगळे यावेळी अनुभवायला मिळाले.
बालवाडीच्या पहिल्या दिवशी आजी आजोबांना शाळेचा गणवेश देण्यात आला. आजी-आजोबांनी एका रांगेत वर्गात प्रवेश केला. पहिले राष्ट्रगीत, सामूहिक प्रार्थना, बडबडगीते, चित्रकला, गोष्टी, आजी-आजोबांचे विविध खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमास दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग,आजी आजोबा, बालवाडी शिक्षिका उज्ज्वला लोके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.