कणकवली : ‘राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो. माझ्या विरोधात सर्व करून झाले. मात्र सर्व थकले. मी कोणाला घाबरत नाही, असा थेट इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकारणातल्या विरोधकांना दिला. राणे विरुद्ध राणे असे कधीच होणार नाही. पक्ष वेगवेगळे असले तरीही राणे वेगळे होणार नाहीत, असेही त्यांनी कणकवलीतील महायुतीच्या जाहीर सभेत स्पष्ट केले.
जवळपास दोन हजार गाड्या खा. राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीवर बांदा येथे थांबल्या होत्या. या स्वागतासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख संजू परब, संजय आग्रे आणि भाजपच्या महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह महायुतीचे सर्वच पदाधिकारी बांदा येथे सीमेवर थांबले होते. सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास खा.राणे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
जगेन तर स्वाभिमानाने...
खा. नारायण राणे म्हणाले, या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हते, गाडीत मिलिंद कुलकर्णी होते त्यांनी मला याबाबतची माहिती दिली. प्रास्ताविकात मिलिंद कुलकर्णी काही गोष्टी बोलले, मात्र हा मेळावा आयोजित करण्याची वेळ का आली हे मला कळलं नाही. आपण ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी आपल्या आयुष्यातील भाजप हा शेवटचा पक्ष आहे असे म्हटले होते, मग चर्चा करण्याची काही गरज नाही. आपला स्वभाव असा आहे, जगेन तर स्वाभिमानाने आणि मानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाही, आपल्याला आयुष्यात अनेक पदे मिळाली, पण पदांचा दुरुपयोग केला नाही असे खा. राणे यांनी स्पष्ट केले.