

कणकवली : मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यात सुरू असलेल्या वाक्युध्दावर माजी आ. वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देत खा. राणे यांना टोला लगावला. ज्येष्ठ नेत्यांवर त्यांच्या मुलांनी केलेली टीका राणेंना दिसत नाही का? असा सवाल नाईक यांनी करत प्रकाश महाजन हे स्व. प्रमोद महाजन यांचे ज्येष्ठ बंधू आहेत याचे तरी भान ठेवणे आवश्यक होते, असा सल्लाही त्यांनी दिला.
याबाबत खा. राणे यांना उद्देशून वैभव नाईक म्हणाले, तुमच्या मुलावर टीका केलेली तुम्हाला झोंबली आणि ती एका ज्येष्ठ नेत्याने केली होती. तुम्ही आणि तुमचे चिरंजीव निवडून आलात याबद्दल दुमत नाही, परंतु तुम्ही आतापर्यंत किती पक्ष बदललेत? ही वस्तुस्थितीही विसरू नका. तुम्ही ज्या पक्षातून बाहेर पडलात त्या पक्षांवर तुमच्या चिरंजीवांनी कशी टीका केली आहे. ज्या सोनिया गांधींनी तुम्हाला काँग्रेसमध्ये गेल्यावर मंत्री केले, तुमच्या मुलाला खासदार केले, त्या सोनिया गांधींवर तुमच्या मुलाने टीका करताना त्यांच्या वयाचे भान ठेवले होते का? ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला घडवलं त्या बाळासाहेबांवर तुमचे मोठे चिरंजीव कसे टीका करत होते.
उध्दव आणि राज ठाकरेंवर तुमचे चिरंजीव कशी टीका करत आहेत. काँग्रेसमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यावर तुमच्या चिरंजीवाने कशी टीका केली होती. त्यावेळी तुमच्या मुलांची वाचाळ प्रबोधने दिसली नाही का? आपल्यावर कोणी टीका केली तर त्यांना मारहाणी पर्यंत धमकी द्यायची. आपल्या मुलांनी ज्येष्ठ नेत्यावर टीका केली तर त्याला लोकमत आहे, ते निवडून आले आहेत असे सांगायचे. आपण लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे आपण मारहाणीची भाषा करू नये.
ज्या भाजपमध्ये तुम्ही आहात त्या भाजप-शिवसेनेची युती घडविण्याचे काम स्व. प्रमोद महाजनांनी केले होते. प्रकाश महाजनांकडे पद असेल नसेल, ते निवडून आले नसतील परंतु ते प्रमोद महाजनांचे ज्येष्ठ बंधू आहेत याचे तरी भान ठेवले असते तरी तुमची वैचारीक गुणवत्ता राहीली असती असा टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला.