कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्डेदुरुस्ती कामाची पावसाने पोलखोल केली आहे. पणदूर आणि वेताळबांबर्डेत चार दिवसांपूर्वी बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. यामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघातांची भीती व्यक्त होत आहे. बुजवलेले खड्डे वारंवार डोके वर काढत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराची डोकेदुखी वाढली आहे. गेली दोन -तीन वर्ष या ठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडत असून किती वेळा खड्डे बुजविणार?, आता बस्स झालं, दोन्ही ठिकाणी डांबर पट्टा उखडून, नव्याने क्रॉक्रिटीकरण करीत रस्ता मजबूत करा, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महामार्गाने सुखकर प्रवास करता येईल, अशी आशा वाहनचालक व प्रवाशांना वाटत होते. मात्र अल्पावधीतच या नव्या महामार्गावर खड्ड्यांची समस्या निर्माण झाली. कुडाळ हद्दीत हुमरमळा, वेताळबांबर्डे पुलानजिक पणदूर हद्दीत आणि वेताळबांबर्डे ब्रिज या तीन ठिकाणी गोव्याकडे जाणारी लेनवर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे.गेली तीन वर्षे पावसाळ्यात या ठिकाणी वारंवार खड्डे पडत आहेत.
हे खड्डे बुजविण्याचे काम महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराकडून दर दोन दिवस आड केले जाते. परंतू बुजविलेले खड्डे 24 तासात पुन्हा ‘ओपन’ होत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदा कंपनीही पुरती हैराण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये डांबर अथवा क्रॉक्रिट तग धरत नसल्याने प्रशासनासमोर डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या तीन वर्षात कित्येकदा या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आल. कधी जांभा दगड, कधी उन्हाळी डांबर, कधी पावसाळी डांबर, कधी पेव्हर ब्लॉक तर कधी सिमेंट क्रॉक्रिटच्या सहाय्याने हे खड्डे बुजविले जातात. परंतू ही मलमपट्टी तकलादू ठरत आहे. त्यामुळे या खड्डयांतून प्रवास करताना वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्याच आठवड्यात ठाकरे शिवसेनेने हुमरमळा येथे महामार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने हे खड्डे युध्दपातळीवर बुजविले.
पावसाळी डांबर घालून रोलरने चांगला दाब देऊन दुरूस्ती केली. मात्र गेले चार दिवस कोसळत असलेल्या पावसान पणदूर आणि वेताळबांबर्डेत पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले. खोल खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी महामार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. डबकी तयार झाल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती आहे.
रविवारी सकाळी वेताळबांबर्डेत पुन्हा ठेकेदार कंपनीने भर पावसात खड्डे दुरूस्तीचे काम सुरू केले होते. अशी दुरूस्ती आतापर्यंत अनेकदा झाली आहे. परंतू ती टिकतच नसल्याने त्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि मजुरांचे श्रम वाया जात आहेत. अशी दुरूस्ती किती वर्ष करणार?. त्यामुळे हा दुरूस्तीचा सोपस्कार बंद करा. या दोन्ही ठिकाणी डांबरी भाग उखडून तेथे सिमेंट क्रॉक्रिटचा मजबूत रस्ता करा, अशी मागणी वाहनचालक , प्रवाशी व नागरीक करीत आहेत.
गणेशोत्सव तोंडावर आला आहे. मुंबईकर चाकरमानी गणेशभक्त गावी दाखल होणार आहेत. बाप्प्पांचाही प्रवास याच महामार्गाने होणार आहे. पर्यटकही याच मार्गाने प्रवास करीत असतात. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी याकडे विशेष लक्ष घालून, संबंधित विभागाला आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे.