

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील डोंगरालगत असलेल्या विलास विठ्ठल हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग खचून हडकर यांच्या घरापर्यंत आला. तर डोंगराच्या मातीमुळे हडकर यांची विहीर बुजून गेली. डोंगर खचण्याच्या या घटनेमुळे हडकर कुटुंबीय भयभीत झाले आहे. याची दखल घेत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देत हडकर कुटुंबीयांना घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केली, त्यानुसार हडकर कुटुंबीय शेजारी असलेल्या अनंत तारी यांच्या घरी स्थलांतरित झाले आहेत. या घटनांमुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने तलाठी एस. जे.सागरे यांनी या ठिकाणच्या सहा कुटुंबीयांना सुरक्षितत स्थळी जाण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस पावसाचा जोर आहे,याच पावसामुळे तालुक्यातील नेरूरपार येथील हॉटेल अंकिता जवळील डोंगराचा काही भाग खचून खाली आला. त्यामुळे येथील विलास विठ्ठल हडकर यांच्या घराला धोका निर्माण झाला.तर दुसरीकडे हडकर यांच्या मालकीची विहीर डोंगराच्या मातीमुळे पूर्णतः बुजून गेली. त्यामुळे हडकर कुटुंबीयांना ऐन पावसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. विलास हडकर यांच्या घरात दोन व्यक्ती राहतात. अलीकडेच मुंबई येथील त्यांचे बंधू व त्यांची वहिनी असे अन्य दोघेजण आले आहेत,त्यामुळे कुटुंबात एकूण चार व्यक्ती राहत आहेत.
शनिवारी सकाळी श्री. हडकर यांच्या घरी लागून असलेल्या डोंगराचा काही भाग खचून घरालगत आला, त्यामुळे हडकर कुटुंबीय भयभीत झाले. याबाबतची माहिती तहसीलदार वीरसिंग वसावे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी हडकर कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती श्री वसावे यांनी केली. त्या नुसार हडकर कुटुंबीय लगत असलेल्या अनंत तारी यांच्या घरी वास्तव्यास गेले आहेत. सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, संदेश नाईक, समीर नाईक, पोलिस पाटील सुरेश नाईक आदींनी घटनास्थळी भेट दिली.