खारेपाटण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण रामेश्वर नगर येथे अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता असून या गंभीर बाबीकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. एखादा अपघात झाल्यानंतरच महामार्ग याकडे लक्ष देणार काय? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचा खारेपाटण रामेश्वर नगर भाग अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सातत्याने लहान-मोठे अपघात होत असतात. या अपघातप्रवण क्षेत्रातच महामार्ग खड्डेमय झाल्याने या अपघातांचा धोका आणखी वाढला आहे.
महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी वाहने रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघातग्रस्त होत आहेत. या खड्ड्यांमध्ये लाल माती टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. नागरिक व वाहन चालकांच्या डोळ्यात केलेली ही धूळफेक असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
या खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे सर्वत्र चिखल पसरला असून रस्ता वाहतुकीस निसरडा बनला आहे. या खड्डयांची हायवे प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांनी त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा सदर खड्ड्यात वाहन आदळून अपघात झाल्यास त्याला महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.