

सावंतवाडी ः सावंतवाडी तालुक्यातील साटेली -कातवाडवाडी येथील सुमित शेंडेकर या युवकाची क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांना ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंडेकर यांच्या व्हॉटस्अॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने फायनान्स अॅप यूझरची बनावट लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक करताच फिर्यादी शेंडेकर यांच्या खात्यातील 12 लाख 50 हजार इतकी रक्कम अन्य खात्यात ट्रान्सफर झाली. यामुळे शेंडेकर यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील करत आहेत. त्या बँक खात्याद्वारे सायबर विभाग या गुन्ह्याचा तपास करत असून संशयित याचा शोध सायबर पोलीस घेत आहे.
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती कोणासोबतही शेअर न करणे, तसेच संशयास्पद वाटणार्या मेसेज किंवा कॉल्सपासून सावध राहणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.