सावंतवाडी : सावंतवाडीच्या मोती तलावात कोणताही हॉटेल प्रकल्प आणण्याचा प्रयत्न यापूर्वी कधी केला नाही आणि यापुढेही कधी करणार नाही, असे माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यापूर्वी ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ ही संकल्पना मी मांडली. त्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. टेंडर, वर्क ऑर्डर काढली. मात्र यासाठी आवश्यक जमीन राजघराण्याकडून देण्याबाबत सहकार्य झाले असते तर एवढ्यात हॉस्पिटल उभे राहिले असते, असा दावा करत आ. दीपक केसरकर यांनी केला. आम्ही अटी घातल्या नाही तर शासनाने घातल्या, असे राजघराण्याचे म्हणणे असेल तर शासनाच्या एमओयूवर त्यांनी सह्या कराव्यात. म्हणजे, त्यांच्याच कुटुंबातील राहिलेली सही देखील होईल. मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सुटेल व ताबडतोब हे काम सुरू होईल, असे आवाहन त्यांनी केले.
आ. केसरकर म्हणाले, मोती तलावामध्ये हॉटेल प्रकल्पाचा प्रस्ताव आपण कधीच दिला नव्हता. उलट राजवाड्यात हॉटेल करावे, असे मी सुचवल होते. त्याप्रमाणे युवराज यांनी राजवाड्यामध्ये स्वतःचे हॉटेल उभे केले. युवराजांचे विधान हे गैरसमजातून आहे. माझी लढाई ही शांततेसाठी होती. कुणी एका व्यक्तीविरोधात कधीच नव्हती. ज्या ज्यावेळी नारायण राणेंसोबत राहिलो तेसुद्धा ठामपणे राहिलो. खा. नारायण राणे यांनी महायुतीने ही निवडणूक लढावी असे जाहीर केले असताना कुणामुळे युती तुटली हे पालकमंत्र्यांनाही ठाऊक आहे. लोकांच्या मनात गैरसमज होईल असे वक्तव्य मी केलेले नाही. नारायण राणेंसह मी दोन वेळा युतीबाबत बोललो होतो. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीसाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, महायुतीत निवडणुका का झाल्या नाहीत याचे उत्तर मंत्री राणेच देऊ शकतात, असे ते म्हणाले.
मालवणात भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात रक्कम जप्त झाली त्यासाठी संबंधितावर एफआयआर होणे आवश्यक होते. मात्र, उलट आ. नीलेश राणेंवर गुन्हा दाखल होत असेल तर ते चुकीचे आहे. व्यवहाराचे पैसे होते असे त्यांचे म्हणणे होत ते सिद्ध करावे लागते. सावंतवाडीमध्ये सर्व कॉर्नर प्रचारात आम्ही आ. राणेंसोबत होतो, त्यामुळे कोणीही त्यांना एकटे पाडलेले नाही. आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. आजारपणामुळे मी फिरू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा, घरोघरी जाऊन प्रचार केला असता. कणकवलीत शिवसेना पक्ष चिन्हावर लढत नसल्याने तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्याचा प्रश्नच नाही असे एका प्रश्नाला उत्तर देताना आ. केसरकर म्हणाले. आम्ही सावंतवाडी नगराध्यक्षपदाची जागा मागितली होती व त्या बदल्यात वेंगुर्ले नगराध्यक्षपद भाजपला सोडण्याची तयारी दर्शविली होती, असे असताना कोणामुळे युती तुटली? हे पालकमंत्र्यांना अधिक चांगले माहिती आहे.