पुढारी ऑनलाईन डेस्क
बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी सांगितले की, शाळांमध्ये सीसीटीव्हींप्रमाणेच (CCTV) सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणदेखील (panic button) बसवले जाऊ जाऊ शकते. हे पॅनिक बटण दाबल्यानंतर पोलिसांनी लगेच गैरप्रकाराची माहिती कळेल. (Maharashtra News)
"...शाळांमध्ये जसे सीसीटीव्ही आहेत; तसे महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणची व्यवस्था केली जाऊ शकते... हे पॅनिक बटण वसतिगृहातही बसवता येऊ शकते. हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे." असे केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
"मुंबई विभागीय उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने बदलापूर घटनेचा तपास केला. विविध विभागातील लोकांचा या तपास कामात सहभाग राहिला. कोणत्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायचे याचा निर्णय पोलिस घेतील. ज्यांचा निष्काळजीपणा आढळून आला आहे; ते आता सहआरोपी म्हणून असतील. त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील,'' असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, विरोधकांचा समाचार घेताना केसरकर म्हणाले, "आता जे टीका करत आहेत; त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काहीही केले नाही. आम्ही अनेक उपाययोजना केल्या आहेत."
बदलापूरमधील शाळेतील दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला आणि बालकल्याण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला अहवाल सोमवारी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. (Badlapur sexual assault case)
तत्पूर्वी, बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शाळा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला. पॉक्सो कायद्याच्या कलम १९ मधील तरतुदींचे पालन केले नसल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली. या प्रकरणी १७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी नराधम अक्षय शिंदे याला अटक केली होती. त्याला आज सोमवारी कल्याण सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.