

नागपूर : आदित्य ठाकरे यांनी त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून शिवसेना संपवायला लावली आणि ते काँग्रेससोबत गेले. त्यांच्यामुळेच युती तुटली, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
शालेय गणवेशात दीपक केसरकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर दणकून टीका केली. ते म्हणाले,‘स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अवाक्षर काढणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीयमंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊ दिले नव्हते ही शिवसेनेची ताकद होती. त्याच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे घडले आहे. त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा असा वडील म्हणून मी त्यांना सल्ला देतो.
मी महाराष्ट्राचा पहिला शिक्षणमंत्री आहे, ज्याने प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. मुले अनवाणी पायांनी शाळेत जात म्हणून त्यांना शुज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला. शालेय गणवेशाचे टेंडर १३८ कोटी रुपयांचे होते. आधी फक्त मागास वर्गातील विद्यार्थी आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनी यांना गणवेश दिले जायचे. या टेंडरमध्ये राज्य सरकारचे जवळजवळ ११ कोटी रुपये वाचले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ शासनाची संस्था आहे. त्यांना हे काम देण्यात आले यात वीस हजार महिला गणवेश शिवण्याचे काम करतात. त्यांना याचा अनुभव नव्हता त्याच्यामुळे कदाचित गणवेश शिवण्याला उशीर झाला असावा, अशी माहिती देत केसरकर यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले. तसेच आदित्य ठाकरे यांनी सर्व पुरावे तपासून बोलायला हवे, असेही ते म्हणाले.