कणकवली : कणकवली शहरातील 13 वर्षीय शाळकरी अल्पवयीन युवतीचे फुस लावून अपहरण करणारा संशयित मल्लिकार्जुन चन्नाप्पा सत्याळ ( 20, रा. शिरंगी-विजापूर, सध्या. रा. कणकवली) याला मलकापूर, जि. कोल्हापूर येथून कणकवली पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे युवतीसह शनिवारी स. 7 वा. ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून रविवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मल्लिकार्जुन हा कणकवलीत उड्डाणपूलाखाली आपल्या नातेवाईकांच्या भाजी दुकानावर दोन-तीन महिन्यांपासून कामास आहे. शहरातील एका शाळकरी युवतीशी त्याची ओळख झाली आणि त्याने त्या ओळखीचा गैरफायदा घेत युवतीला फुस लावून गुरुवारी पळवून नेले होते. शाळेत जाते म्हणून युवती घरातून बाहेर पडली परंतु ती शाळेत पोहोचली नाही आणि घरीही परतली नसल्याने तिच्या पालकांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान कणकवली पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून त्या युवतीचा माग काढण्यास सुरुवात केली. संशयित मल्लिकार्जुन हा त्या युवतीला मोटरसायकलवरून पळवून कर्नाटक राज्यातील अथनी गावात गेला होता. तेथे त्याने युवतीसह मित्राकडे मुक्काम केला. त्याचे वडिल त्या ठिकाणी एका चिरेखाणीवर कामास आहेत. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून माग काढत कर्नाटक गाठले, परंतु संशयित मल्लिकार्जुन तेथून मलकापूर येथे पसार झाल्याचे समजले.
कर्नाटकात त्याचे लोकेशन सांगलीच्या दिशेने आढळले. मलकापूर येथे पोलिस पथक पोहोचले असता एक कर्नाटक पार्सिंगची गाडी तेथे उभी होती. तेथेच संशयित मल्लिकार्जुन युवतीसह पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलिस पथकाने युवतीसह ताब्यात घेऊन कणकवलीत आणले. कणकवली पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, हवालदार सुदेश तांबे, महिला पो. कॉ. प्रणाली जाधव यांनी ही कारवाई केली.