मटक्याचे जिल्हाभर जाळे... करोडो रुपयांची उलाढाल! (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Matka Gambling Sindhudurg | मटक्याचे जिल्हाभर जाळे... करोडो रुपयांची उलाढाल!

वेंगुर्ले, कुडाळ आणि मालवणमधील चिठ्ठ्या सावंतवाडीतील अड्ड्यावर

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाभर मटक्याचे जाळे पसरले असून, दिवसाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस आता या अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी सरसावले असून, या अड्ड्यांवरील सामान, साहित्य इतरत्र हलविण्यात आले आहे. कणकवली पाठोपाठ सावंतवाडी येथे बुकींचा मोठा अड्डा असून, या अड्ड्यावर वेंगुर्ले, कुडाळ आणि मालवण तालुक्यातील बुकींच्या चिठ्ठ्या दररोज पोहोचत असल्याची माहिती मिळाली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये मटका अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर आणि पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पोलिस यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वा. ही धाड पडल्यानंतर सावंतवाडीतील मुख्य अड्ड्यावरील गाशा गुंडाळण्यात आला होता. त्याबरोबरच मालवण, वेंगुर्ले आणि कुडाळमधील बुकींचे अड्डे बंद झाले होते. गेले तीन दिवस जिल्ह्यातल्या अनेक टपर्‍या बंद असून विविध मार्गानी मोटारसायकलवरून चिठ्ठ्या घेवून जाणारे मटका बुकींचे साथीदार गायब झाले आहेत. पोलिस मात्र कारवाया करण्यासाठी धावपळ करत असून त्यांना कारवाईसाठी गुन्हेगार सापडत नसल्याचेही चित्र आहे.

सावंतवाडी तालुक्यात तीन अड्डे

सावंतवाडी येथे दोन मोठे मटका बुकींचे अड्डे असून एक तुलनेने छोटा अड्डा आहे. यातील एक अड्डा चालविणारा धंदेवाईक पूर्वी गोव्यामध्ये मटका व्यवसाय करायचा, अलीकडे त्याने सावंतवाडी परिसरात हा अड्डा सुरू केल्याचे सांगण्यात येते. आणखी दोन अड्डे सावंतवाडीत कार्यरत असतात. तो जो मुख्य अड्डा आहे तिथे वेंगुर्लेतून आणि कुडाळ व मालवण येथून काही मोटरसायकलस्वार चिठ्ठ्या घेवून येतात, अर्थात वेंगुर्ले, कुडाळ आणि मालवण इथेही छोटे-मोठे मटका बुकींचे अड्डे आहेत. या अड्ड्यांवरून तालुक्यांचे नेटवर्क सांभाळले जाते. तालुक्यांमध्ये ज्या छोट्या बाजारपेठा आहेत तिथून टपर्‍यांवर मटका घेतला जातो, या चिठ्ठ्या घेवून मोटारसायकलस्वार सावंतवाडीच्या दिशेने जातात. हीच स्थिती कुडाळ तालुक्यातही आहे. कुडाळ तालुक्यातही दोन मोठे बुकी असल्याची माहिती मिळाली आहे. वेंगुर्ले तालुक्यामध्ये तर सावंतवाडीतील बुकीचीच माणसे मटका गोळा करत असतात.

वैभववाडी शहरात शासकीय गोडावूनच्या परिसरात राजरोसपणे मटका धंदा सुरु आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवली येथील मटका अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे मटका एजंट, ग्राहक व पोलिस या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. गेली अनेकवर्षे याठिकाणी हा धंदा सुरु आहे. वर्षातून एखाद्यावेळी कारवाई करून पोलिस खात्याकडून सोपस्कार केले जातात. मात्र या धंद्यावर त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. यामुळे अगदी शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत या मटक्याच्या व्यसनात अडकलेले दिसतात. वैभववाडी शहरात दोन मटका मोठे एजंट असल्याची माहिती मिळत असून त्यांचे कनेक्शन कोल्हापूर असल्याचे समजते. तर वैभववाडी बरोबरच तालुक्यातील आणखी काही गावात मटका धंदा सुरु असल्याची माहिती आहे. भुईबावडा परिसरात सुरु असलेल्या धंद्याचे रत्नागिरी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सुरू असलेल्या या राजरोस मटक्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. मात्र या राजरोसपणे सुरू असलेल्या धंद्याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल पणे हा सर्व प्रकार उघड्या डोळ्याने पाहत आहे.

मटक्याच्या चिठ्ठ्या दुपारी आणि संध्याकाळी पाठविल्या जातात

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील या पट्ट्यात मटक्याचा मुख्य केंद्र हा सावंतवाडी शहर आहे. सावंतवाडी शहरामध्येच कुडाळ व मालवण तालुक्यातील मटक्याच्या चिठ्ठ्या दुपारी व संध्याकाळी पाठवल्या जातात; आता बहुतांशी चिठ्ठ्या व्हॉट्सअ‍ॅप वरूनच पाठवल्या जातात पण ज्या चिठ्ठ्यांमधील आकडे येतात, त्या आकड्यांचे पैसे देण्यासाठी मटका बुकीच्या मर्जीतील खास माणसे चिठ्यांद्वारे आकडे लावून घेणार्‍या टपर्‍यांवर जातात, हे सर्व काम ठराविक वेळेत मटका बुक्किची खास माणसे करतात आणि ते सावंतवाडी मध्ये चिठ्ठ्या घेऊन येतात असा हा सोमवार ते शनिवार पर्यंतचा दिनक्रम मटका बुकिंचा असतो. साध्या कागदावर आकडा लावला किंवा मटक्याचा आकडा चिठ्ठीवर लावला आणि समजा चिठ्ठी मिळाली नाही तरी मटका बुकी तेवढे पैसे आपल्या गिर्‍हाईकाला सब बुकीकडे पाठवून देतो अशी पध्दत या मटका व्यवसायामध्ये आहे. आता गणेशोत्सव जवळ असल्यामुळे अनेकांच्या हातात पैसा खेळत असल्यामुळे सहाजिकच मटका व्यवसाय सुद्धा तेजीत असतो; मात्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या मटक्यावरील धडकेमुळे मटका व्यावसायिक पूर्णतः हादरुन गेले आहेत.आता कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्गात अवैध व्यवसाय यापुढे चालू देणार नाही अशी ताठर भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतल्यामुळे मटका बुकीसह सब बुकीची मोठी अडचण झाली आहे ,त्यासोबत या मटका बुकींसोबत हितसंबंध असलेल्या खाकी वर्दीतील अनेक लोकांची मोठी अडचण झाली आहे.

देवगड तालुक्यातले बुकी कणकवलीशी कनेक्ट

देवगड तालुक्यात दोन मोठे बुकींचे अड्डे असून विजयदुर्ग भागामध्येसुध्दा एक अड्डा कार्यरत आहे. हे तीन अड्डे कणकवलीशी कनेक्ट असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व अड्ड्यांकडे बुकींग करून त्याची माहिती कणकवलीकडे दिली जाते. त्यासाठी खास माणसे नेमण्यात आली आहेत. देवगड तालुक्यातील बाजारपेठांमध्ये अनेक टपर्‍यांवर मटका घेतला जातो.

तालुक्यातील दोन्ही प्रमुख बाजारपेठा दोडामार्ग पोलिस ठाण्यात येतात. अशा अवैध धंद्यावर कारवाई करा अशा आशयाचे निवेदन, आंदोलन वारंवार होतात; पण पोलिस मात्र याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे येणार्‍या काळात असे अवैध धंदे पोलिसांना दाखविण्यासाठी पालकमंत्री यांना धाड टाकावी लागणार की पोलिस धाड टाकणार? हे मात्र येणार्‍या काळात दिसून येईल.

कणकवली तालुक्यात अनेक बाजारपेठांमध्ये मटका घेणार्‍या टपर्‍या आहेत. या बाजारपेठांमध्ये छोटे छोटे बुकींचे अड्डे आहेत. या अड्ड्यांवर मटका घेवून त्याचा रिपोर्ट कणकवलीतील अड्ड्यावर पाठविला जातो. ज्यांचे पैसे द्यायचे आहेत अशा छोट्या बुकींकडे पैसे घेवून जाणारे काही मोटारसायकलस्वार नेमण्यात आले आहेत. हे सर्व नेटवर्क पालकमंत्र्यांच्या कारवाई नंतर थांबलेले आहे. पोलिसही त्यांच्या मागे लागले आहेत.

मोबाईलवरही आकडा आणि पैसे पाठविले जातात

दोडामार्ग तालुक्यात असे अड्डे चालविणार्‍या बुकींचे धाबे दणाणले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील मोठ्या बुकींचे प्रमाण कमी असले तरी हा तालुका मटक्याच्या बाबतीत बोलायला गेले तर बांद्यातून कंट्रोलिंग केला जातो. शिवाय गोवा राज्यातून सुद्धा काहीजण कंट्रोल करत आहेत अशी माहिती या निमित्ताने पुढे आली आहे. कित्येक जण बेरोजगार असून मटका व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करत आहेत. मटक्याच्या बाबतीत बघितले तर खेळण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी बाजारात टपरीवर प्रत्यक्षात जाऊन खेळावे लागायचे. आता चक्क मोबाईलवरून व्हाट्सअपवर आकडा पाठविला की झाले. शिवाय खेळण्यात येणारी रक्कम देखील गुगल पेच्या माध्यमातून पाठविली जाते अशा चर्चा आहेत. त्यामुळे हा मटका व्यवसाय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हायटेक झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दोडामार्ग तालुक्यात दोन प्रमुख बाजारपेठ आहे यात दोडामार्ग शहर आणि साटेली भेडशी या दोन्ही बाजारपेठांमध्ये जोरदार मटका व्यवसाय सुरू आहे आणि या व्यवसायांचे प्रमुख बुकी बांदा व गोवा राज्यातील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT