

सोगाव : अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलिसांनी आगरसुरे येथे छापा टाकून धडक कारवाई करत देशी दारूच्या बाटल्यांच्या साठ्यासह आरोपीला अटक केली आहे.
याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आगरसुरे ते बामणसुरे रोडवरील म्हात्रे पोल्ट्री समोरील मोकळ्या जागेत एक व्यक्ती अवैधरित्या दारूच्या बाटल्यांचा साठा करून तो बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून प्लास्टीकच्या एकूण 235 बाटल्या जप्त केल्या असून एकूण 19 हजार 520 रुपये किमतीचा साठा जप्त केला असून आरोपी वसंत पांडुरंग म्हात्रे (वय 75), रा. आगरसुरे, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्याविरुद्ध पो.शि. सौरभ अनंत पाटील (वय28) मांडवा सागरी पोलीस यांनी फिर्याद दाखल केली आहे.
यानुसार आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर त्याच दिवशी रात्री 9 वाजुन 51 मि. वाजता मांडवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोह ए. व्ही. करावडे हे करीत आहेत.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात अवैधरित्या चालणार्या प्रत्येक अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार येत्या काळात मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध व बेकायदेशीर धंद्यावर कडक कारवाई केली आहे व यापुढेही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे, यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. जागृत नागरिकांनी आपल्या परिसरात चालणारे बेकायदेशीर धंदे यांची माहिती पोलिसांना द्यावी, सदर माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन मांडवा पोलिसांनी केले आहे.