सावंतवाडी ः शासनाने 15 मार्च 2024 रोजी काढलेल्या अन्यायकारक परिपत्रकामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याचे संकट ओढावले आहे. या निर्णयाविरोधात आणि मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी सोमवार 5 जानेवारी रोजी स.10.30 वा. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे.
मोर्चामागील प्रमुख मागण्या व आक्षेप
15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा, शाळा बंद करणारे आणि शिक्षक भरती रोखणारे परिपत्रक तत्काळ मागे घ्या, बेरोजगारांना डावलून निवृत्तांची भरती नको, डी.एड,बी.एड.धारक तरुण बेरोजगार असताना निवृत्त शिक्षकांना पुन्हा नेमण्याचा निर्णय चुकीचा आहे. 5 वीची चाचणी रद्द करा, विद्यार्थ्यांवर लादलेली अतिरिक्त चाचणी परीक्षा रद्द करून शिक्षकांना ऑनलाईन माहितीच्या ओझ्यापासून मुक्त करावे. सर्व शाळांमध्ये इंटरनेट सुविधा पुरवण्यात यावी, खासगी शाळांची लाखो रुपयांची फी गोरगरीब पालकांना परवडणारी नाही, त्यामुळे सरकारी शाळांची गळती थांबवावी.