

उदय बापर्डेकर
मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटीचा खालील भाग पोकळ बनला असून येथे जेटी खचून धोकादायक बनली आहे. जेटीच्या खालील भरावाचे दगड निखळले असून ओहोटीच्या वेळी जेटीचे धोकादायक रूप निदर्शनास येत आहे. यामुळे ओहोटीच्या वेळी जेटीकडे किल्ला प्रवासी होड्या लावणे मुश्किल बनले असून शुक्रवारी सायंकाळी 4 वा.पासून याच कारणास्तव किल्ला होडी सेवा बंद ठेवावी लागली. तसेच किल्ला जेटी तसेच मालवण बंदर जेटीकडे मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने होडी व्यावसायिकांना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत लेखी तक्रारी देऊनही बंदर विभाग लक्ष देत नसल्याने किल्ला प्रवासी होडी व्यवसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मालवणच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी मालवण बंदर जेटी ते किल्ला अशी होडी सेवा आहे. या होडी सेवेसाठी काही वर्षांपूर्वी किल्ल्याला लागून जेटी बांधण्यात आली. या जेटीमुळे पर्यटकांना होडीतून सुरक्षितरित्या उतरविणे व पुन्हा होडीत चढविणे सुलभ झाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जेटीच्या बांधणीवेळी समुद्रात घातलेला दगडांचां भराव पोकळ होत आहे. यातील काही दगड निसटले असून जेटीचा खालील भाग धोकादायक स्थितीत आहे. ओहोटीच्या वेळी जमीन व जेटी यांच्या मध्ये पोकळ भाग बनल्याचे दिसून येत आहे. यामुळे होड्या जेटीच्या जवळ लावणे मुश्किल व धोकादायक बनले आहे. जेटीच्या खालील भाग आणखी खचत गेल्यास जेटीला धोका निर्माण होऊन जेटी कोसळण्याचीही भीती आहे. यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे.
जेटी मार्गांवर गाळ साचल्याने अडचणी वाढल्या
सिंधुदुर्ग किल्ला जेटी मार्गावर तसेच मालवण बंदर जेटी येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे ओहोटी वेळी दोन्ही जेटीकडे होड्या लावणे मुश्किल बनले आहे. गाळामुळे ओहोटीच्या वेळी होड्या जेटीकडे नेण्यात अडचणी येत असल्याने काही वेळा होडी सेवा बंद ठेवावी लागते. गुरूवारी सायंकाळी 4 वा. याच कारणाने किल्ला होडी सेवा बंद करावी लागली. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. होडी व्यवसायिकांनाही नुकसान सहन करावे लागलेे. हा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी होडी व्यवसायिकांनी वारंवार बंदर विभागाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे.