

कुडाळ : प्रगत सिंधुदुर्ग मुंबई ही चाकरमान्यांच्या मदतीसाठी स्थापन झाली असून या संस्थेच्या माध्यमातून भविष्यतही हे काम असेच अविरत चालू राहील, अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी दिली. मुंबई येथे झालेल्या मंडळाच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हेटकरी भंडारी मंडळ दादर पश्चिम येथे हि सभा झाली.
श्री. चौधरी यांनी संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. त्यामध्ये शेतकरी मेळावे, महिला बचतगट मेळावे, वैद्यकीय शिबिरे, वृद्धाश्रमांना केलेली मदत, आदिवासी शाळांना केलेली मदत, कोरोना काळात विविध शासकीय कार्यालयांना संस्थेने स्वतः बनविलेल्या सॅनिटायझर मशीन्सचा पुरवठा, सॅनिटायझर, सी विटामिन टॅबलेटस, नेब्युलायझर, पूरग्रस्तांना केलेली मदत याबद्दल उहापोह करत भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून हे काम अविरत चालू राहील, अशी ग्वाही श्री. चौधरी यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करणारे सत्यवान रेडकर यांनी प्रगत सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून मुंबईत असो वा सिंधुदुर्गमध्ये असो, अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे घेतली जात असतील, तर त्यांना मोफत मार्गदर्शन करण्याकरिता आपण केव्हाही तयार असल्याचे सांगितले. जॉन्सन लिफ्ट कंपनीचे फायनान्स ऑफिसर सूर्यकांत बागवे, यांनी कोकणातील आय. टी. आय. पास, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल डिप्लोमा धारक तरुणांना आपल्या कंपनीमध्ये खात्रीने नोकरी देण्याकरीता आश्वासित केले.
संस्थेच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावल्याबाबत सुरेश पांचाळ, महादेव लाड, अनिल तांडेल, प्रमोद राणे, ॲड. आरती गवंडे, सुविधा गोवेकर, कादंबरी गवंडे, शैलेश धुरी यांचे कौतुक करण्यात आले. घाडीगावकर समाजाचे अध्यक्ष मेघःश्याम घाडीगावकर, एअर इंडिया लोकाधिकार समितीचे प्रशांत सावंत, हेटकरी भंडारी समाजाचे कार्यकारी मंडळ सदस्य भाई मांजरेकर आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सतेज दळवी यांनी तर आभार अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी मानलेे.