मालवण : भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात महिलांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांना निवेदन दिले. (छाया : उदय बापर्डेकर) 
सिंधुदुर्ग

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे मालवणवासीय त्रस्त!

Malvan Stray Dog - रेवतळे परिसरातील महिलांनी वेधले नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Malvan Residents Troubled by Rising Stray Dog Menace

मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीतील रेवतळे, सागरी महामार्ग तसेच संपूर्ण परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे आणि चावण्याचा प्रयत्न करणे अशा घटना सतत घडत आहेत. शाळेत जाणारी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी रेवतळे परिसरातील महिलांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडे केली. यावर माहिती देताना नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी आरोग्य विभागाच्या वतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी निविदा काढण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले.

नागरिकांच्या सुरक्षेच्या व शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या प्रश्नाबाबत आ. निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले आहे. ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. असे नगराध्यक्षा यांनी सांगितले. रेवतळे परिसरातील अमृता फाटक, तारका चव्हाण, मीना फाटक, वेदिका गोसावी, मेधा मुरकर, दर्शना चव्हाण, प्राजक्ता हळदणकर, स्वाती बांदेकर, मोहिनी हडकर, राखी हडकर, सीमा गावडे, दीपाली मांजरेकर, पूजा मांजरेकर, अपर्णा मडये आदी महिलांनी हे निवेदन श्रीमती वराडकर यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे, परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे आणि चावण्याचा प्रयत्न करतात. यामुळे शाळेत जाणारी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी सागरी महामार्गावर जॉगिंगसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही याची धास्ती आहे. अचानक कुत्रे आडवे आल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. भटक्या कुत्र्यांचे टोळके एकत्र येऊन गाई-गुरांच्या लहान वासरांवर आणि इतर पाळीव जनावरांवर जीवघेणे हल्ले करत आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे.

भविष्यात भटक्या कुत्र्यांमुळे कोणतीही मनुष्यहानी किंवा पशुहानी झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही महिलांनी पत्राद्वारे दिला आहे. महिलांची भुमिका जाणून घेतल्यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी स्पष्ट केले, पालिकेच्या वतीने यापूर्वी ८०० भटक्या कुत्र्यांचे यशस्वी निर्बिजीकरण करण्यात आले आहे. आता वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्याने ४०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार असून, आरोग्य विभागामार्फत याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT