सावंतवाडी ः भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या माजगाव येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाला. सावंतवाडी परिसरातील या शेवटच्या मोठ्या जत्रोत्सवाला जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यातूनही हजारो भाविकांनी हजेरी लावत श्री सातेरी चरणी माथा टेकवला.
उत्सवामित्त सकाळी मंदिरात अभिषेक, पूजा व अन्य धार्मिक विधी झाले. श्री सातेरी देवीसह पंचायतनातील सर्व देवतांना भरजरी वस्त्रे आणि सुवर्णालंकारांनी मढवण्यात आले होते. देवीचे हे तेजस्वी आणि मंगलमय रूप डोळ्यांत साठवण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपारिक गाऱ्हाणे घालून देवीची मानाची ओटी भरण्यात आली आणि त्यानंतर सार्व.दर्शनाला सुरुवात झाली. जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाजत-गाजत निघालेली मिरवणूक. यामध्ये म्हालटकर देवघराकडून पालखी व अब्दागिरी.,घाडी मानकऱ्यांकडून तरंगकाठी,चौगुले मानकऱ्यांकडून श्री महादेवाची उत्सवमूर्ती वाद्यांच्या गजरात सातेरी मंदिरात आणण्यात आली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गर्दीचा ओघ मोठा होता. मात्र, स्थानिक देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि मानकऱ्यांनी चोख नियोजन केल्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळाले. संपूर्ण मंदिर परिसर, सभामंडप आणि कळसावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने माजगावनगरी उजळून निघाली होती.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या उत्सवात फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर कोकणची लोककला असलेल्या पार्सेकर दशावतार कंपनीच्या नाटकाने उपस्थितांचे मनोरंजन केले. गावातील चाकरमानी, पाहुणे आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीने माजगावात आनंदाला उधाण आले होते.