

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या लोकवस्तीत गवा रेड्यांचा कळप वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी माठेवाडा-मदारी रोड कॉलनी येथे प्रदीप नाईक यांच्या घरा जवळ गव्यांचा एक कळप आढळून आला.
विशेष म्हणजे, हे गवे पाळीव जनावरांप्रमाणे शांतपणे चारा खाताना दिसले. गेल्या काही दिवसांपासून नेमळे, सावंतवाडी आणि माजगाव या शहरी भागात गवा रेड्यांचा वावर वाढला आहे. यामुळे अनेकदा वाहनांचे अपघात झाले असून, त्यात काही लोक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. नागरिकांच्या मते, वन विभाग सुस्त अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडून मानवी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीवर वन विभागाने तातडीने लक्ष घालून या गव्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.