

सावंतवाडी ः सावंतवाडी-माजगाव परिसरात शनिवारी सकाळी सहासीटर रिक्षा चालक लव पेडणेकर यांच्या रिक्षाला भर रस्त्यात एका गवारेड्याने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात प्रवासी थोडक्यात बचावले. वनविभागाने याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजगाव परिसरात गव्यांचा वावर वाढला आहे. हे गवे वारंवार रस्त्यावर येत असून यामुळे वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजगावचे उपसरपंच संतोष वझरे आणि संजय कानसे यांनी वनविभागाला तातडीने गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. अपघात रोखण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्हांला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. स्थानिक ग्रामस्थांनीही या परिसरातील गवारेड्यांच्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येतील.