वेंगुर्ला येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री उदय सामंत. 
सिंधुदुर्ग

Maharashtra first space park project - देशातील पहिला स्पेस पार्क प्रकल्प महाराष्ट्रात : उदय सामंत

महाराष्ट्रात देशातील पहिला स्पेस पार्क उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्याच्या बेरोजगार निर्मूलनासाठी शासनाच्या माध्यमातून स्पेस पॉलिसी हा देशभरातील पहिलाच उपक्रम महाराष्ट्र राज्यासाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री सामंत हे पॅरीस दौरा करून शुक्रवारी थेट आपल्या मूळगावी वेंगुर्ला येथे गणेशोत्सवासाठी आले होते. यावेळी त्यांनी भटवाडी येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

मंत्री सामंत म्हणाले, 'स्पेस पॉलिसी' भारत देशात कुठेच नाही आणि स्पेस म्हणजेच अंतराळ पॉलिसी करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला होता, त्याची अंमलबजावणी कशी करायची याची माहिती आम्ही पॅरीस मधील कार्यशाळेमध्ये घेतली. त्यानंतर आम्ही दोन ते तीन धोरणात्मक निर्णय अंतराळ पॉलिसीच्यानिमित्ताने घेतले. अंतराळ पॉलिसी करीत असताना ईस्त्रो मधून चंद्रयान अंतराळात चंद्रावर गेले. परंतु, हे यान चंद्रावर जात असताना त्याचे जे पार्ट होते ते देशाच्या विविध भागामध्ये बनविले. स्पेस पॉलिसी अंतर्गत आम्ही असे एक दालन उभे करतोय आणि देशातला पहिला स्पेस पार्ट हा महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून जी जी आधुनिकता होती, ती आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी जोपासली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाच स्वतःचे सॅटेलाईट करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कंपनीशी बोलणेही झाले आहे. या सॅटेलाईटची वैशिष्टयात कृषि विभाग, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, शहरी विभाग नियोजन, आरोग्य नियोजन आणि उद्योग हे विभाग असून या क्षेत्रामध्ये हा सॅटेलाईट काम करेल. हे पाच सॅटेलाईट आम्ही १८ महिन्यात सुरू शकलो तर समोरचे ग्राहकदेखील मिळू शकतील. भविष्यात जर ग्राहक मिळाले तर आज ज्या कंपन्यांनी दीडशे ते दोनशे कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे, त्या गुंतवणूकीतून हजारो कोटी रूपयांचा महसूल पुढच्या १८ महिन्यांत आपल्याला मिळू शकेल. म्हणूनच स्पेस पॉलिसीच्या माध्यमातून हा सॅटेलाईटचा उपक्रम आम्ही राबवित आहोत, अशी माहि मंत्री सामंत यांनी दिली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, शिवसेनेचे शहरप्रमुख अजित राऊळ, रूपेश राऊळ, पिंटू गावडे आदी उपस्थित होते.

ना. सामंत म्हणाले, फेब्रुवारीमध्ये आम्ही अंतराळ महोत्सवाचे आयोजन करणार आहोत. यामध्ये विज्ञान, अंतराळ अभ्यास यासह अंतराळाशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. यात जागतिक स्तरावरील कंपन्याही सहभागी होतील. या महोत्सवामुळे अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या कंपन्या महाराष्ट्रात येतील आणि त्यामुळे बेरोजगार निमूर्लनाचा कार्यक्रम सुरू होईल. पॅरिसमधील कार्यशाळेतून आम्हाला हे यश मिळाले आहे.

अशी माहिती आम्ही नेहमी मुंबईमधून देतो. आज ही माहिती वेंगुर्ला येथून देण्याची संधी मिळाली, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. महाराष्ट्रस्तरावरची पत्रकार परिषद आज माझ्या मूळगावी होतेय याचे मला समाधान आहे.

सॅटेलाईट सोडण्यासाठी जमिनीपासून एक हजार ते दोन हजार फूट उंची लागते. आपल्याकडे अगोदरच माथेरान एक आहे आणि तर दूसरे आ. किरण सामंत यांच्या मतदारासंघात माचाळ नावाचे हिलस्टेशन आहे, ती जागा सुद्धा दाखविली आहे. सॅटेलाईटचे नियोजन हे उंचावर आणि थंड हवेच्या ठिकाणी असाव, अशी संकल्पना आहे. त्यातून रोजगार निर्मिती होत असल्याने वरील दोन गावे आम्ही नजरेसामोर ठेवली आहेत. यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. देशामध्ये एका राज्याचे पाच सॅटेलाईट असावेत अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

गुन्हा केला असेल तर कारवाई होणारच !

यावेळी पत्रकारांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर दाखल झालेल्या अंमली पदार्थ गुन्हाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, मंत्री सामंत म्हणाले की, सिद्धेश परब हे आमच्या शिवसेनेचे अधिकृत उपजिल्हाप्रमुख आहेत. गांजा बाळगणे, त्याची विक्री करणे हा नुसता गुन्हा नसून तर तो देशद्रोह आहे. सिद्धेश परब हे त्याच्यात असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु, या प्रकरणाचा घटनाक्रम आपण पाहिला, पोलिस निरीक्षकांना आलेले फोन बघितले, त्यांच्या घराबाहेर ठेवलेली पुडी जर पाहिली तर कुठेतरी शंका येते. पण श्री. परब हे त्यात सहभागी असतील आणि तसे शाबित झाले तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी, जिल्हाप्रमुखांची आणि सर्वांची भूमिका आहे.

प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

श्री. परब यानीं फक्त मायनिंगला विरोध केला म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मी पोलिस महासंचालकांकडे मांडलेली आहे. याबाबतीत झालेल्या पूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी अशाप्रकारचे पत्र मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे. पण एमबी आणि गांजा बाळगणे हा माझ्यादृष्टीने देशद्रोह आहे. तशाप्रकारे माझा अधिकारी किंवा पक्षाची पदाधिकारी असेल तर जरूर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. पण वस्तुस्थिती नसताना जर कारवाई झाली असेल तर करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT