Sindhudurg News : पावसाच्या दडीने भातशेती धोक्यात!

भातरोपांची वाढ खुंटली; उत्पादनात मोठी घट होण्याची भीती
Sindhudurg News
सततच्या अवकाळी पावसाने भातपिके धोक्यातPudhari
Published on
Updated on

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार गंभीर संकटात सापडले आहेत. सततचे कडक ऊन आणि पावसाच्या लांबलेल्या खंडाने खरीप हंगामातील भातपिकांची वाढ पूर्णपणे खुंटली असून, आगामी वर्षातील आंबा, काजू आणि नारळ-सुपारीच्या उत्पादनावरही याचे तीव्र विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

पावसा अभावी भातशेतीत तणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून पिकांवर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे भाताची रोपे सुकू लागली आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे हापूस आंबा आणि काजूच्या झाडांच्या नवीन पालवीवर परिणाम होत असून, यामुळे पुढील हंगामातील मोहर आणि फळधारणेला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, नारळ व सुपारीच्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करावा लागत असल्याने उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.

जलसाठ्यात मोठी घट

जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी आणि कणकवली या तालुक्यांना पावसाच्या या खंडाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाअभावी लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीतही कमालीची घट होण्याची भिती आहे.

​वार्षिक पर्जन्यमानात निम्म्याने घट : मुळदे कृषी केंद्र आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण २१३७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत (१७ सप्टेंबर २०२५ पर्यंत) तब्बल ३५६३.६ मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसात १४०० मि.मी. पेक्षा जास्त घट झाली आहे. (सन २०२५ मध्ये एकूण वार्षिक पर्जन्यमान ४०४७.५ मि.मी. नोंदवले गेले होते).

​तापमानात वाढ आणि बाष्पीभवन : गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. (गतवर्षी याच दिवशी कमाल तापमान २९.० अंश सेल्सिअस होते). सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के आणि दुपारची ७८ टक्के होती. वाऱ्याचा वेग ताशी १.३ किमी, सूर्यप्रकाश ५.४ तास आणि बाष्पीभवनाचा वेग १.८ मि.मी. नोंदवला गेला आहे.

तालुकानिहाय दैनंदिन पाऊस (१७ सप्टेंबर)

​देवगड: १५ मि.मी., ​कणकवली: ०४ मि.मी., ​कुडाळ: ३.६ मि.मी., ​वेंगुर्ला: ०२ मि.मी., ​वैभववाडी: ०२ मि.मी., ​मालवण: ०० मि.मी., ​सावंतवाडी: ०० मि.मी., ​दोडामार्ग: ०० मि.मी. आता पर्यंतचा सरासरी पाऊस: ३.३२५ मि.मी.

​पंचनाम्याची अन् भरपाईची मागणी

येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांचे अपरिमित नुकसान होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ नुकसानीचा आढावा घ्यावा आणि बाधित शेतकरी व बागायतदारांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news