मडुरा : घरातील मंडळी वास्को येथे गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मडूरा - देऊळवाडी येथील प्रकाश परब यांचे भरवस्ती मधील बंद घर फोडले. यात 3,500 रुपयांच्या रोकडसह सोन्याची वेणी, चांदीचे ब्रासलेट व नाणे असा एकूण सुमारे 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बांदा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मात्र, चोरी प्रकरणाची नोंद नसल्याचे सांगितले. संशयित चोरटा स्थानिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
मडूरा -देऊळवाडी येथे ग्रामपंचायत नजीक प्रकाश परब यांचे घर आहे. ते आपल्या पत्नीसह बुधवारी वास्को येथे सप्ताह सोहळ्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून बुधवारी मध्यरात्री चोरट्याने मुख्य दरवाजाचा कुलूप कटावणीच्या सहाय्याने तोडून प्रवेश केला. तीन खोल्यांमधील तीन वेगवेगळी बंद कपाटे चोरट्याने फोडली.
एका कपाटातील सोन्याची वेणी, चांदीचे ब्रासलेट व नाणे तसेच साडेतीन हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला . स्थानिकांनी सकाळी पाहिले असता दरवाजा उघडा दिसला. याबाबतची माहिती त्यांनी प्रकाश परब यांना फोनवरून दिली. पोलीस पाटील नितीन नाईक यांनी चोरीची माहिती बांदा पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळाची माहिती पाहणी केली.