

सावंतवाडी/ दोडामार्ग : शनिवारी दक्षिण सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर दिसून आला. या पावसामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात काही ठिकाणी घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र घरांवर झाडे पडल्याने घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दोडामार्ग तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साटेली-भेडशी (सुतारवाडी) येथील रहिवाशी सूर्यकांत न्हानू धर्णे यांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र धर्णे यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोडामार्ग तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संतत धार सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 2 वा.च्या सुमारास सतत कोसळणार्या पावसामुळे सूर्यकांत धर्णे यांच्या राहत्या घरातील स्वयंपाकघराची आणि इतर भागाची भिंत मोठ्या आवाजासह कोसळली. यावेळी झालेला आवाज ऐकून घरातील मंडळी जागी झाली. कसला आवाज आला याची पाहणी केली असता भिंत संपूर्णपणे कोसळून स्वयंपाकघर जमीनदोस्त झाल्याचे त्यांना दिसून आले.
सुदैवाने घटनेच्या वेळी घरातील सदस्य दुसर्या खोलीत झोपलेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, शनिवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच गावच्या सरपंच छाया धर्णे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तलाठ्यांना पाचारण करून अधिकृत पंचनामा करण्यात आला. सरपंचांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
शुक्रवारी रात्री चराठा- तळखांबवाडी येथे झालेल्या वादळी पावसामुळे दोन घरांवर एक महाकाय सागवान (सागाचे) झाड कोसळले, यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, दोन्ही घरातील व्यक्ती थोडक्यात बचावल्या. गजानन नारायण बांदेकर आणि दत्तप्रसाद नारायण बांदेकर यांची घरे एकमेकांना लागून आहेत. त्यांच्या घराशेजारी असलेले 25 फूट उंचीचे एक भलेमोठे सागवान झाड वादळामुळे त्यांच्या घरांवर कोसळले. या घटनेत गजानन बांदेकर यांच्या किचन रूमसह पडवीचे वासे, रिप, कौले आणि छप्पर पूर्णपणे निकामी झाले आहे. तर दत्तप्रसाद बांदेकर यांच्या किचन रूम आणि संडासचे वासे, रिप, कौले आणि छप्पर यांचेही मोठे नुकसान झाले आहे. याच वादळात सुरेश रामचंद्र परब यांचा माड (नारळाचे झाड) अर्ध्यावरून तुटून चराठा-ओटवणे या मुख्य रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गावातील इतर ठिकाणीही झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच, शनिवारी सकाळी तलाठी सुप्रिया घोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यात येत आहे.