आंबोली : निर्णय राऊत
जैवविविधतेत बिबट्या हा अतिमहत्वाचा तसेच अतिशय चतुर, चाणाक्ष आणि कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेणारा हिंस्त्र प्राणी आहे. तर सह्याद्री परिसरातील सुरक्षित अधिवासातील बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ऑक्टोबर ते जानेवारी ह्या काळात त्यांच्या रुबाबदार शैलित मुक्त संचार करताना विविध भागांत बिबट्यांचे दर्शन होते. तर गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गासह आंबोली वनपरीक्षेत्रात बिबट्यांचा ग्रामीण भागात मोठा वावर हा दिसून येत आहे. त्यामुळे काही गावांत तर भीतीचे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग तसेच लगतच्या जिल्ह्यांमधील सर्वच वनक्षेत्रात तथा वनक्षेत्राबाहेर शेकडो बिबट्यांचा अगदी मुक्त संचार आहे. सोबतच अनेक भागात काळे बिबटे (ब्लॅक पँथर) सुद्धा आढळून येतात. याच कोकणातील बिबट्यांचे वैशिष्ठ्ये म्हणजेच त्यांचे वजन साधारणपणे २० ते २० किलो असते, अंगावर काळे पोकळ ठिपके आणि गडद सोनेरी चमकदार त्वचा असते, त्यांची धावण्याची गती खूप जास्त असते. तसेच रानटी खूर असलेले प्राणी (उदा. हरणे, डुक्कर, गवे आदी), माकडे, ससे, उंदीर (काही अपवाद वगळता) आणि मानवी वस्तीजवळ सर्व पाळीव प्राणी (कुत्रे, शेळ्या, कोंबड्या) हे त्यांचे मुख्य अन्न आहे. तर वनक्षेत्राबाहेरील ऊसाची शेते किंवा गावालगतच्या परिसरात अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्यांचा वावर वाढल्याचे गेल्या काही वर्षात दिसून येते.
बिबट्याचा स्वतःचा विशिष्ट इलाखा किंवा एरिया हा सामान्यतः १५ ते ५० चौरस किलोमीटर एवढा असू शकतो, परंतु तो भक्ष्याची उपलब्धता, लिंग आणि भौगोलिक परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून असतो. नर बिबट्याचा एरिया मादी बिबट्याच्या तुलनेत खूप मोठा असतो. एका नर बिबट्याचा इलाखा साधारणपणे ३० ते ८० चौरस किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो.
एका नराच्या हद्दीत एकापेक्षा जास्त मादी बिबट्यांचे क्षेत्र असू शकते. तर मादी बिबट्याचा इलाखा लहान असतो, जो साधारणपणे १० ते ३० चौरस किलोमीटर दरम्यान असतो, कारण तिला तिच्या पिल्लांची सुरक्षा आणि जवळच अन्न शोधणे सोपे जावे लागते, यासह बिबट्या आपल्या एरियाची हद्द निश्चित करण्यासाठी झाडांवर नखांनी ओरखडे ओढतो, तसेच विशिष्ट ठिकाणी लघवी करून आणि विष्ठेद्वारे आपला वास सोडतो. या वासावरून दुसऱ्या बिबट्याला समजते की हा दुसऱ्याचा इलाखा आहे.
दरम्यान, बिबट्यांचा सध्या सर्वत्र वावर निदर्शनाला येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही विणीचा हंगाम व सहज मिळणारे अन्न असू शकते. तर बिबट्यांचा कोणताही एक विशिष्ट किंवा निश्चित विणीचा हंगाम नसतो; ते वर्षभरात कोणत्याही महिन्यात जुळणी करू शकतात. तथापि, भौगोलिक परिस्थिती आणि अन्न-पाण्याची उपलब्धता यानुसार त्यांच्या प्रजननामध्ये काही विशिष्ट बदल दिसून येतात.
लोकवस्तीनजीक बिबट्या... लहान मुलांची काळजी घ्या
सिंधुर्गातील ग्रामीण भागात सद्या लोकवस्तीनजीक बिबट्यांच्या हालचाली वाढल्या आहेत, असे निदर्शनास येतात. त्यामुळे स्थानिकांनी शेतात जाताना तसेच शेतीचे काम करताना विशेष सावधानी सह काळजी घेणे आवश्यक. यासह पहाटे, संध्याकाळी आणि रात्री बिबट्या जास्त सक्रिय असतो, त्यामुळे यावेळी एकटे बाहेर जाणे टाळावे, घराच्या आसपास घाण किंवा दाट झुडपे साचू देऊ नका, लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना उघड्यावर एकटे सोडू नये.
... म्हणून या काळात बिबट्यांच्या हालचाली वाढतात
महाराष्ट्रात (सह्याद्री) बिबट्यांच्या विणीच्या हंगामाबाबत अनेक वन्यजीव अभ्यासकांच्या मते मे महिन्याचा पावसाळापूर्व काळ आणि त्यानंतरचे काही महिने हा त्यांच्या प्रजननाचा मुख्य काळ मानला जातो. मात्र, कोकणात तसेच ऊस शेती प्रदेशात ऑक्टोबर ते डिसेंबर (थंडीत) हाच बिबट्यांचा मुख्य प्रजननाचा काळ मानला जातो. या काळात जंगलात किंवा शेतीमध्ये लपायला पुरेशी जागा आणि भक्ष्य सहज उपलब्ध होते. अन् ग्रामीण भागात शेती काळात हिवाळ्याच्या सुरुवातीला बिबट्यांच्या हालचाली प्रचंड वाढतात.
बिबट्या हा मुळात एकटा राहणारा प्राणी आहे. फक्त विणीच्या काळात नर आणि मादी साधारण ५ ते ७ दिवस एकत्र येतात आणि प्रजनन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा आपापल्या क्षेत्रात निघून जातात. त्याचकाळात अनेकांना जोडीने बिबट्यांचे दर्शन होते. याच दरम्यान मादी बिबट्या साधारणपणे अशा ठिकाणी पिल्लांना जन्म देते जिथे शेतात उसासारखे दाट पीक लपण्यासाठी सुरक्षित आडोसा देते. किंवा घनदाट झाडे झुडपे परिसर. यावेळी बिबट्याचा गर्भधारणेचा काळ साधारणपणे ९० ते १०० दिवस असतो. मादी एका वेळी २ ते ४ पिल्लांना जन्म देते. जन्मानंतर पिल्ले ९ ते ११ दिवसांनी डोळे उघडतात., सोबत साधारण ३ महिन्यांच्या झाल्यानंतर ती आईसोबत शिकारीसाठी बाहेर पडतात आणि १८ ते २४ महिने आईसोबत राहतात. त्यांनतर त्यांच्या प्रवृत्ती नुसार स्वतंत्र किंवा कळपाने वावरतात.