कुडाळ : तेर्सेबांबर्डे येथील शिरीष गुणवंत सावंत यांचे बंद घर चोरट्याने फोडून आत प्रवेश केला. मात्र, या बंगल्यात चोरट्यांच्या हाती केवळ फॅन, गॅस सिलेंडर, टिव्ही हाती लागले. ही घरफोडी सोमवार, 30 जून ते सोमवार, 7 जुलै या दरम्यान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची फिर्याद लक्ष्मण दशरथ सावंत यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
तेर्सेबांबर्डे- मळवाडी येथे शिरीष सावंत यांचे घर आहे,सावंत कुटुंबीय मुंबईत असल्यामुळे त्यांचे घर बंद असते. त्या घराची देखभाल लक्ष्मण सावंत यांच्याकडे होती. लक्ष्मण सावंत हे सारस्वत बॅक मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असुन ते त्या घराची देखभाल करतात. 30 जून रोजी लक्ष्मण सावंत हे शिरीष सावंत यांच्या घरी गेले तेव्हा सर्व सुस्थितीत होते. मात्र सोमवारी 7 जुलै रोजी सकाळी 9.30 वा. लक्ष्मण सावंत पुन्हा श्री.सावंत यांच्या घरी देखभालीसाठी गेले असता त्यांच्या घराभोवती त्यांनी फेरी मारली असता घराच्या दोन्ही बाजुच्या खिडक्यांचे ग्रील उचकटलेले दिसले.
घराच्या पाठीमागील बाजुची सीसीटीव्ही कॅमेर्याची वायर तुटलेली होती, घराच्या मागील दरवाजा कटावणी सारख्या हत्याराने पेचुन दरवाजाची आतील कडी तोडून त्याद्वारे आत प्रवेश करून घरातील एक सोनी कंपनीची LED जुनी वापरती रू.3,500,एक HP कंपनीचा भरलेला घरगुती सिलेंडर रु.3,400,एक HP कंपनीचा रिकामी घरगुती सिलेंडर 2,500, जुना वापरता, एक सीसीटीव्ही कॅमेर्याची DVR मशिन 2,500,एक APE कंपनीचा ग्रास कटर रु.7000,एक फॅन रु.1000, टेबल फॅन 1000,प्लास्टीकचे टेबल रु.2000 असे मिळून एकुण किंमत 22,900 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवानंद माने, पोलिस श्री.बुतेलो यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला सुद्धा पाचारण केले. मात्र श्वान काही अंतरावर जात घुटमळले.याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलिस अनिल पाटील करीत आहेत.