कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा तेंडोली-गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी (दि. 9) कोसळला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसविणे धोकादायक झाले होते. याबाबत पालकांनी कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्यावेळी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच, शिक्षण विभागामार्फत तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.मात्र, प्रशासनाने अद्यापपर्यंत पर्यायी व्यवस्था न केल्याने संतप्त पालकांनी सोमवारी मुलांना शाळेसमोरील अंगणात बसवून भर उन्हात आंदोलन सुरू केले. शिक्षण विभागाने तात्काळ पर्यायी व्यवस्था तसेच छप्पर दुरूस्ती करण्याची मागणी पालकांनी लावून धरली. या आंदोलनाने प्रशासनाने जागे होत धावाधाव केली.
जि. प. शाळा तेंडोली गावठणवाडी शाळेची इमारत जुनी आहे. सध्या या इमातीला दोन वर्गखोल्या आहेत. या शाळेची पटसंख्या 19 असून पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग भरतात. या शाळेची ही इमारत जुनी असून छप्पर पूर्ण नादुरुस्त झाले आहे. इमारतीचा दर्शनीभाग मोडकळीस आला आहे. पावसाळ्यात छप्परातून पाणी गळू नये म्हणून पालकांनी प्लास्टीक कागदाच्या सहाय्याने तात्पुरती उपाययोजना केली होती. गेले वर्षभर शाळा इमारतीच्या दुरुस्तीबाबत शिक्षक व पालकांनी शिक्षण विभागाला अनेक निवेदने देत लक्ष वेधले होते. मात्र या इमारतीचा दुरूस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
त्यातच 9 जानेवारी रोजी या इमारतीच्या एका वर्गखोलीचे छप्पर कोसळले. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडल्याने अनर्थ टळला. याबाबतची माहिती मिळताच पालकांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर श्री.किंजवडेकर यांनी शाळेला भेट देत 12 जानेवारीपर्यंत मुलांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासनानुसार अद्याप मुलांची पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे पालकांनी मुलांना शाळेच्या समोरील अंगणात भर उन्हात बसवून आंदोलन सुरू केले. शिक्षण विभागाने तात्काळ पर्यायी व्यवस्था तसेच छप्पर दुरूस्ती करण्याची मागणी पालकांनी लावून धरली. यावेळी पालक विष्णू तेंडोलकर, सत्यवान तेंडोलकर, प्रदीप तेंडोलकर, तुकाराम राऊळ निलेश जाधव, तेजस तेंडोलकर, वेदिका तेंडोलकर, परशुराम तेंडोलकर, सुहास तेंडोलकर, अस्मिता तेंडोलकर, अनामिका तेंडोलकर, तसेच माजी सरपंच मंगेश प्रभू, रामचंद्र राऊळ आदींसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते व रणजित देसाई यांनी आंदोलनस्थळी धाव घेत पालकांशी चर्चा केली. तसेच याबाबत पं.स. प्रशासनाशी चर्चा करून पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली. कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर व गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी दुपारी शाळेला भेट देऊन पालकांशी चर्चा केली.
खासगी जागेत विद्यार्थ्यांची तात्पुरती सोय केली
शाळा दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, तो मंजूर करून तातडीने काम पूर्ण केले जाईल. तोपर्यंत तेथेच एका खासगी जागेत शालेय मुलांना बसण्याची तात्पुरत्या स्वरूपात सोय करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी सांगितले. त्यानंतर पालकांनी आंदोलन स्थगित केले. पोलिसपाटील संजय नाईक, माजी सरपंच मंगेश प्रभू, मुख्याध्यापिका रिया परब व शिक्षिका चैताली जोशी आदींसह शाळा समिती पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.