कुडाळ : कुडाळ येथे शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोन्ही पक्षांनी शुक्रवारी सायंकाळी नारळीपौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढली. अपेक्षेप्रमाणे दोन्ही शिवसेनेने आपापली स्वतंत्र रिक्षा रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दोन्ही गटांनी शहरातून भंगसाळ नदीपात्रापर्यंत रिक्षा रॅली काढत नदीपात्रात नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी केली.
पहिली निघालेली शिंदे शिवसेनेची रॅली नवीन बसस्थानक जवळ आ.निलेश राणेंचे आगमन होण्यासाठी थांबली. त्याचवेळेस मागावून निघालेली ठाकरे शिवसेनेची रॅली तेथून पुढे पास झाली. त्यावेळी पोलिसांनी कडा करीत ठाकरे सेनेची रॅली पास केली. मात्र त्याचवेळेस दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, मात्र पोलिसांनी सजग भूमिका बजावल्याने पुढे शांततेत रॅली झाली व दोन्ही गटांनी भंगसाळ नदीला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी केली.
कुडाळ मध्ये गेल्यावर्षी नारळी पौर्णिमेला रिक्षा रॅली दरम्यान शहरात दोन गटात जोरदार वादावादी झाली होती. त्यामुळे यंदा पोलिसांनी रिक्षा रॅलीवर बंधने घातली होती. परंतू त्यानंतर पोलिसांनी निर्बंध उठवून, दोन्ही गटांना वेळ ठरवून देत रॅलीला परवानगी दिली. त्यानुसार दरवर्षी प्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) प्रणितरिक्षासंघटनांनी शुक्रवारी सायंकाळी शहरात रिक्षा रॅलीचे आयोजन केले होते. प्रथमतः येथील श्री देव पाटेश्वर मंदीरातील पालखीने निघालेला मानाचा नारळ प्रशासनाच्या उपस्थितीत भंगसाळ नदीत अर्पण करण्यात आला. जिल्हारिक्षाचालक - मालक संघटना तसेच नागरीकांनी भंगसाळ नदी पात्रात श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे शिवसेना प्रणित रिक्षा संघटनांनी डिजेच्या तालावर शहर मुख्य बाजारपेठेतून रिक्षा रॅलीकाढून भंगसाळ नदीत मानाचे नारळ (श्रीफळ) अर्पण केले.
दोन्ही पक्षांनी यारॅलीत जास्तीत जास्त रिक्षा सहभागी करण्यावर भर दिला होता. तसेच आपापल्या पक्षांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत आणि सजविलेल्या रिक्षांवर पक्षांचे झेंडे लावून लक्षवेधी शक्तिप्रदर्शन केले. शिंदे शिवसेनेने शिवसेनेचे गीत आणि धनुष्यबाण चिन्हाचे भगवे झेंडे तर ठाकरे शिवसेनेने मशाल गीत आणि मशाल चिन्हाचे भगवे झेंडे लावत शक्तिप्रदर्शन केले.
पोलिस प्रशासनाने शिंदे शिवसेनेला आधी व शिवसेना ठाकरे गटाला नंतर अशी रॅलीला परवानगी दिली होती. दोन्ही पक्षांनी सकाळपासूनच आपापल्या पक्ष कार्यालय परिसरात सजविलेल्या रिक्षा आणण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी पोस्ट ऑफिस चौक येथून शिंदे शिवसेनेच्यारिक्षारॅलीला सुरुवात करण्यात आली. नवीन बसस्थानक येथे आ. नीलेश राणे रॅलीत सहभागी झाले. या रॅलीत उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि.प. माजी अध्यक्ष संजय पडते व रिक्षा व्यावसायिक सहभागी झाले होते.
मागाहून ठाकरे शिवसेना शाखा येथून ठाकरे शिवसेनेच्या रिक्षा रॅलीला सुरूवात झाली. पण नवीन बसस्थानक येथे ही रॅली पुढे पास झाली. यावेळी माजी आ. वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे आदींसह कार्यकर्ते, रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. वैभव नाईक, अमरसेन सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण करण्यात आला.