कुडाळ : सरंबळ नदीपात्रात एक मृतदेह वाहून आला असून तो मृतदेह झाडीत अडकला आहे. असा फोन कुडाळ पोलिसांना आला. पोलिस व आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता दाखवत फारबर बोट व यंत्रणेसह सरंबळ नदीपात्र गाठले. मात्र नदीपात्रात उतरून खात्री केल्यावर तो एक मोठ्या आकाराचा टेडी बिअर निघाला. हा विषय सरंबळ पंचक्रोशीत चर्चेसाठी कारणीभूत ठरला.
कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे नदी-नाले दूथडी भरून वाहत आहेत. मंगळवारी रात्री कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली. अशातच बुधवारी संध्याकाळी सरंबळ भागात एका मृतदेह तरंगताना आढळला.
नदीपात्रातील झाडीत हा मृतदेह अडकल्याचे दिसत होते. याबाबत पोलिस यंत्रणेला माहिती देण्यात आली. एखादी व्यक्ती नदीच्या पुरात वाहून आली असावी, असा अंदाज पोलिस व स्थानिकांना आला. नदीपात्र तुडुंब भरलेले असल्याने पात्रात उतरणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आपत्कालीन फायबर बोट घेत नदीपात्र गाठले. बोटीने बचाव पथक मृतदेहापर्यंत पोहोचले असता ते एका टेडी बिअर असल्याचे दिसून आले.
यानंतर स्थानिकांसह प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान याबाबतचे वृत पसरताच अनेकांनी नदी किनारी गर्दी केली होती.