इनसेटमध्ये अपघातग्रस्त कार, तपास करताना पोलीस अधिकारी गणेश कराडकर Pudhari
सिंधुदुर्ग

Mumbai Goa Highway Robbery | कुरिअर कंपनीचा कंटेनर लुटीचा कुडाळ पोलिसांकडून पर्दाफाश: वापरलेली कार एका गुन्ह्याशी संबंधित

Kudal Police | मुंबई- गोवा महामार्गावर ओसरगाव ते कुडाळ दरम्यान ब्लू डार्ट कुरिअर कंपनीच्या कंटेनरला अडवून लुटण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Goa Highway Courier Container Robbery

कुडाळ: कुडाळ तालुक्यात मुंबई- गोवा महामार्गावर ओसरगाव ते कुडाळ दरम्यान ब्लू डार्ट कुरिअर कंपनीच्या कंटेनरला अडवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना मंगळवारी (दि. ३०) पहाटे उघडकीस आली. संशयित कारचा पोलिसांनी पाठलाग केला असता कुडाळ–वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर भीषण अपघात घडला. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात कार चालक सुजल सचिन पवार (वय २१, रा. झाराप) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलीस ठाणे, सिंधुदुर्ग येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश रमेश कराडकर हे २९ डिसेंबर रोजी रात्री ११ ते ३० डिसेंबर पहाटे ५ या कालावधीत कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त घालत होते. त्याचदरम्यान ब्लू डार्ट कुरिअरच्या कंटेनरला अडवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यात प्राप्त झाली.

ब्लू डार्टचे शिफ्ट इन्चार्ज शिवराम पराडकर व कंटेनर चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूरहून कुडाळकडे येत असताना ओसरगाव टोलनाका ओलांडल्यानंतर एका राखाडी रंगाच्या बलेनो कारने संशयास्पदरीत्या कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी न थांबवता वेग वाढवून कुडाळच्या दिशेने वाहन नेले. यावेळी बलेनो कारमधील पाच ते सहा जणांनी कंटेनरवर दगडफेक केल्याने बाजूच्या आरशाचे नुकसान झाले.

घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक कराडकर व त्यांच्या पथकाने संशयित बलेनो कारचा पाठलाग सुरू केला. पहाटे सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास कुडाळ–वेंगुर्ला मुख्य रस्त्यावरील माठेवाडा येथील नक्षत्र टॉवरजवळ सदर बलेनो कारने गीता हॉटेलसमोरील सिंधुदुर्ग बँकेच्या एटीएमला, गोबी मंच्युरियन स्टॉलला तसेच रस्त्यावर उभी असलेल्या भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी बंड्या सावंत यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात बलेनो कारचे एअरबॅग्स उघडले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर कारमधून चार तरुण बाहेर पडताना आढळून आले. त्यांची नावे सुजल सचिन पवार (२२, रा. झाराप), राहुल अमित शिरसाट (१९, रा. कुडाळ), सिद्धांत अशोक बांदेकर (२५, रा. कुडाळ) आणि मंदार सोनु उमळकर (१८, रा. कुडाळ) अशी आहेत. चौकशीत हीच कार ब्लू डार्ट कंटेनरचा पाठलाग करणारी असल्याचे स्पष्ट झाले.

अपघातात नुकसान झालेल्या वॅगनर कारचे मालक अनिल ऊर्फ बंड्या सावंत यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे मान्य केले आहे. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी फिर्याद दाखल केली. आरोपी चालक सुजल सचिन पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

…ती कार आधीच पोलिसांच्या रडारवर

सदर बलेनो कार यापूर्वीही एका गुन्ह्याशी संबंधित आढळून आल्याने ती पोलिसांच्या रडारवर होती. रात्रीच्या गस्तीदरम्यान या कारकडे पोलिसांचे लक्ष गेले आणि संशय बळावला. पाठलाग सुरू असतानाच अपघात घडल्याने संशयित तरुणांसह बलेनो कार पोलिसांच्या ताब्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT