

Four Laning Work Mumbai Goa Highway
कोलाड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सध्या वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. २५ डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आणि आल्हाददायक थंडीचा लाभ घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. मात्र खांब–कोलाड परिसरात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
खांब व कोलाड परिसरात महामार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एसटी बस, खासगी चारचाकी, रिक्षा, दुचाकी व इतर वाहनांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ही कोंडी नेमकी केव्हा सुटणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कोलाड येथे उड्डाणपुलाचे तसेच पुलालगत सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. खांब येथील पुलाच्या अपूर्ण अवस्थेमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोलाडचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यासह पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस महामार्गावर विविध ठिकाणी तैनात असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.