कुडाळ : कुडाळ शहरात जमा होणार्या कचर्यामधील प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू बनवण्याचा प्रकल्प लवकरच कुडाळ एमआयडीसीमध्ये नगरपंचायतीच्या जागेत कार्यान्वित होईल. त्याबाबतची प्राथमिक चर्चा न. पं. सर्वसाधारण बैठकीत झाली. यावेळी संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधीने कशा पद्धतीने प्लास्टिकपासून विविध साहित्य तयार केले जाईल, त्याबाबत बैठकीत माहिती दिली. तसेच प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले एक-दोन पेव्हर बॉक्स नमुन्यासाठी बैठकीत दाखवले. या प्रकल्पाला सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवली.
कुडाळ नगरपंचायतची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर -शिरवलकर यांच्या उपस्थितीत झाली. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नातू आदींसह नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
कुडाळ शहरातील कचर्यामधील प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी नगरपंचायतीच्या एमआयडीसीमधील जागेत एजन्सीला केवळ जागा, वीज कनेक्शन व पाणी नगरपंचायतने देण्याचे आहे, बाकी सर्व जबाबदारी एजन्सीची राहणार असल्याचे बैठकीत अधिकारी श्री. नाटेकर यांनी सांगितले. एजन्सीचे प्रतिनिधी श्री. बांदिवडेकर यांनी कशा पद्धतीने प्रोसेसिंग केली जाईल? याबाबत बैठकीत माहिती दिली.
कुडाळ शहरात ओर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर (ओडब्ल्सूसी) या मशीनसाठी पर्यायी जमीन उपलब्ध नाही, त्यामुळे आहे, त्याच ठिकाणी त्या मशीनवर ट्रायल घ्या आणि त्या मशीनवर खर्च किती येतो ते बघा. पहिल्या टप्प्यात अधिक दुर्गंधी येणार असल्यामुळे मच्छीचा कचरा न घेता भाजीचा कचरा घ्या. बंदावस्थेत असलेल्या ओडब्ल्यूसी मशीनला खर्च कमी येत असेल तरच ती मशीन कार्यान्वित करा, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या. मशीन दुरुस्तीच्या खर्चाचा ताळमेळ घालूनच काम करा, विनाकारण पैसे खर्च करून नका, अशा सूचना सुध्दा नगरसेवकांनी केल्या.
कचर्यातील प्लास्टिकबाबत नगरपंचायतने चर्चा केली. मात्र, इतर कचर्याचे आपण काय करणार? याबाबत नगरसेवक नीलेश परब यांनी प्रश्न केला. यावेळी अन्य कचरा प्रक्रियेबाबतही कार्यवाही केली जाईल, असे नगराध्यक्षा सौ. बांदेकर यांनी सांगितले. शहरात असलेली ग्रामपंचायत काळातील पाणीपुरवठा योजना नगरपंचायतीकडे वर्ग झाली का? असा सवाल संध्या तेरसे यांनी केला.यावर संबंधित कर्मचार्यांनी याबाबत आपल्याला माहीत नसल्याचेे सांगितले.
शहरातील गणेश घाटांकडे जाणार्या रस्त्याची डागडुजी करण्याबाबत चर्चा झाली. कुडाळ शहरामध्ये एकूण सात गणेश घाट आहेत. त्याठिकाणी खड्डे, लाईट व्यवस्था सुरळीत करा, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या. शहरातील वृक्ष गणना करण्यासाठी कुडाळ हायस्कूलला सोबत घेतले जाणार असल्याचे सीईओ श्री. नातू यांनी सांगितले. शहरातील जैवविविधता अद्ययावत करणे, भैरव मंदिरमध्ये जीर्ण झालेली पाईपलाईन बदलून घेणे, न.पं.साठी सबमर्सिबल पंप खरेदी करणे, दिव्यांग निधी उपलब्धता करून दिव्यांगांना अर्थसहाय्य करणे, निराधार महिलांना आर्थिक सहाय करणे, शहरातील इमारतींच्या सांडपाण्याच्या टाक्या साफ केल्यानंतर गोळा मैला मिश्रीत सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्र्रिया प्रकल्प केंद्र राबविण्याबाबत चर्चा झाली.
माठेवाडा येथील सार्वजनिक विहीर जीर्ण झाल्याने नागरिकांना धोका आहे. सदर विहीर जमीनदोस्त करणे आवश्यक आहे, याबाबत चर्चा झाली. शहरात लवकर चार्जिंग पॉईन्ट होणार असल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.
सीईओ साहेब कुडाळ शहरातील पाणी प्रश्नाचा एकही प्रश्न थांबवून ठेवू नका. पालकमंत्री,आमदार आमचेच आहेत, त्यांच्याशी आम्ही थेट चर्चा करून हे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे भाजपा गटनेते विलास कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी ‘आमचे’ या शब्दाचा धागा पकडत उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी ‘आमचे’ नाही ‘आपले सर्वांचे’ म्हणा, असे सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.