कुडाळ एसटी आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश दत्ताराम वारंग (वय 41) यांचे कुडाळ एमआयडीसी परिसरात झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण एसटी विभाग, नातेवाईक आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
निलेश वारंग रविवारी वालावल येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून एमआयडीसी मार्गे सावंतवाडी येथील घरी परतत होते. मात्र एमआयडीसीतील रेल्वे ब्रीजजवळ असलेल्या मोठ्या गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे त्यांच्या दुचाकीची त्यावर अचानक धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की ते दुचाकीवरून खाली पडले आणि रस्त्यावर डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जवळच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन वारंग यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेवढ्यातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तातडीने उपचार सुरू करूनही त्यांना वाचवता आले नाही.
अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी तुकाराम हरिश्चंद्र चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या गतिरोधकाजवळील परिस्थितीची तपासणी केली असून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निलेश वारंग हे सध्या कुडाळ आगारात सहाय्यक वाहतूक निरीक्षक (ATI) म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि बांदा या डेपोमध्येही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनाची बातमी समजताच एसटी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अनेकांनी त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली, आई-वडील आणि भाऊ-वहिनी असा परिवार आहे. कुटुंबावर ओढवलेले हे दुःख अतिशय मोठे आहे. त्यांनी अल्पावधीतच सेवा करताना अनेक सहकाऱ्यांशी जवळीक निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने एसटी परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.