Konkan Railway car on train service Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Konkan Railway: चाकरमान्यांचा कारसह प्रवास होणार सुखकर! भारतातील पहिली रेल्वेची 'कार ऑन रो-रो' सेवा कोकणात सुरू

Konkan Railway car on train service: या निर्णयामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधून आपल्या कारने गावी येणाऱ्या हजारो चाकरमान्यांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वेने सुरू केलेल्या भारतातील पहिल्या 'कार ऑन रो-रो' (Roll-on/Roll-off) सेवेला आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हक्काचा थांबा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून, कोलाड ते गोवा (वेरणा) दरम्यान धावणाऱ्या या विशेष ट्रेनला कणकवली तालुक्यातील नांदगाव स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधून आपल्या कारने गावी येणाऱ्या हजारो चाकरमान्यांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अल्प प्रतिसादानंतर नव्या थांब्यामुळे आशेचा किरण

कोकण रेल्वेने काही काळापूर्वी प्रवाशांना त्यांच्या कारसह रेल्वेने प्रवास करता यावा, या उद्देशाने कोलाड ते वेरणा (गोवा) अशी 'कार-ट्रेन' सेवा सुरू केली होती. या अभिनव प्रयोगाला सुरुवातीला प्रवाशांकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र, या सेवेला कोकणच्या मध्यवर्ती ठिकाणी थांबा नसल्यानेच प्रवासी याकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून आले. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्टेशनवर थांबा मिळाल्याने या सेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा एक वरदान ठरणार आहे.

कार ऑन रो-रो सेवा आणि दरपत्रक

या सेवेमुळे प्रवाशांना मुंबई-पुण्याहून थेट कोलाडपर्यंत गाडी चालवून, तिथून पुढे रेल्वेने आपल्या कारसह नांदगाव स्टेशनवर उतरता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि शीण दोन्ही वाचणार आहे.

  • कोलाड ते नांदगाव स्टेशनपर्यंत कार नेण्यासाठी 5 हजार 460 + जीएसटी इतका खर्च येईल.

  • थ्री-टायर एसी (3AC): प्रति व्यक्ती 690 रुपये (एका कारसोबत दोन व्यक्ती प्रवास करू शकतात).

  • सेकंड सिटिंग (2S): प्रति व्यक्ती १४० रुपये

स्थानिक मागणीला यश, चाकरमान्यांचे होणार स्वागत

नांदगाव स्टेशनवर या सेवेला थांबा मिळावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीची दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि मुंबईवरून येणाऱ्या पहिल्या चाकरमान्यांचे स्वागत करण्यासाठी स्थानिक नागरिक सज्ज झाले आहेत. या निर्णयामुळे केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर कोकणातील पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. थकवणाऱ्या आणि खर्चिक रस्ते प्रवासाला एक सुरक्षित आणि आरामदायी पर्याय मिळाल्याने कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT