

Konkan Railway RoRo Service 2025 Passenger Guide In Marathi
मुंबई : मुंबईहून गोव्यात- कोकणात फिरायला जायचा बेत करताय पण ऐवढ्या लांब कारने जायचा कंटाळा आलाय? ट्रेनने गेलात तर गोव्यात फिरायचं कसं? गणेशोत्सवात मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करायचा या विचारानेच तुम्हाला कार चालवायचा कंटाळा येतोय का? मग आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोकण रेल्वेने कारचालकांसाठी रोरो सेवा सुरू केली आहे. ही सेवा नेमकी काय, किती शुल्क द्यावे लागेल हे सोप्या भाषेत समजून घ्या...
कोकण रेल्वेची कार मालकांसाठीची ‘रो-रो सेवा’ नेमकी काय आहे?
रोल-ऑन रोल-ऑफ (Ro-Ro) ही एक अशी सेवा आहे जिथे तुमची खासगी कार एका खास डिझाइन केलेल्या रेल्वे वॅगनवर (फ्लॅटबेड) चढवली जाते आणि रेल्वेमार्गाने इच्छित स्थळी पोहोचवली जाते. यामुळे तुम्हाला स्वतः गाडी चालवत लांबचा प्रवास करावा लागत नाही. ही सेवा तुमचा वेळ, इंधन वाचवते आणि प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी बनवते.
ही सेवा कोणत्या स्थानकांदरम्यान उपलब्ध आहे?
ही सेवा महाराष्ट्रातील कोलाड (Kolad) आणि गोव्यामधील वेर्णा (Verna) या दोन स्थानकांदरम्यान चालवली जाईल. ही एक एंड-टू-एंड सेवा असेल, म्हणजेच या दोन स्थानकांदरम्यान गाडी कुठेही थांबणार नाही.
मुंबई, ठाण्याच्या प्रवाशांसाठी काय पर्याय आहे?
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकावरून ही सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच मुंबई, ठाणे, बोरीवली, कल्याण- डोंबिवली अशा कोणत्याही भागात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला कार घेऊन कोलाड रेल्वेस्थानकच गाठावे लागणार आहे. तुमच्याकडे इतर कोणताही पर्याय नाही.
कोकण रेल्वेची रोरो सेवा कधीपासून सुरू होत आहे?
कोलाड येथून: 23 ऑगस्ट 2025 पासून.
वेर्णा येथून: 24 ऑगस्ट 2025 पासून.
अंतिम तारीख: ही मर्यादित कालावधीसाठीची सेवा असून, 11 सप्टेंबर 2025 पर्यंत एक दिवसाआड उपलब्ध असेल.
हो. प्रत्येक कारसोबत जास्तीत जास्त तीन व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी असेल.
प्रवाशांना त्याच ट्रेनला जोडलेल्या ३एसी किंवा द्वितीय श्रेणी सीटिंग कोचमधून प्रवास करता येईल. यासाठी त्यांना रेल्वेचे निर्धारित शुल्क भरावे लागेल:
3 एसी कोच: ₹935/- प्रति प्रवासी
द्वितीय श्रेणी सीटिंग: ₹190/- प्रति प्रवासी
रो-रो सेवा गाड्यांचे वेळापत्रक काय आहे?
गाडी सुटण्याची वेळ: सायंकाळी 5 वाजता (दोन्ही स्थानकांवरून).
गाडी पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता.
रोरो सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या किती तास आधी स्थानकावर पोहोचावं?
प्रवाशांनी आपल्या कारसह गाडी सुटण्याच्या 3 तास आधी, म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत संबंधित स्थानकावर हजर राहणे बंधनकारक आहे.
कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेसाठी बुकिंग कसे करता येईल?
बुकिंग कालावधी: 21 जुलै 2025 ते 13 ऑगस्ट 2025.
बुकिंगची ठिकाणे:
मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400614.
वेर्णा रेल्वे स्टेशन, वेर्णा, गोवा.
कार वाहतूक शुल्क: प्रत्येक कारसाठी ₹7,875/- (जीएसटीसह).
नोंदणी शुल्क: बुकिंग करताना ₹4,000/- भरावे लागतील आणि उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी जमा करता येईल.
पेमेंट पर्याय: युपीआय (UPI) आणि रोख रकमेचा पर्याय उपलब्ध आहे.
रोरो सेवेसाठी अटी आहेत का?
हो. या सेवेसाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे एका फेरीसाठी किमान 16 गाड्यांचे बुकिंग होणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी बुकिंग झाल्यास ती फेरी रद्द केली जाईल आणि प्रवाशांना त्यांचे नोंदणी शुल्क पूर्णपणे परत केले जाईल.
रो- रो सेवेसंदर्भात माहिती हवी असल्यास कोणाला संपर्क साधावा?
अधिक माहितीसाठी, कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला (www.konkanrailway.com) भेट द्या किंवा बेलापूर कार्यालय (900447097) किंवा वेर्णा स्टेशन (9686656160) येथे संपर्क साधा.