मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार्या एक्स्प्रेस गाड्यांसह विशेष गाड्यांच्या आगाऊ आरक्षण तिकिटांत काळाबाजार होत असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून होत आहे. रेल्वेकडून गणेशोत्सव, होळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक विशेष गाड्या सोडूनही सामान्य प्रवाशांना तिकिटेच मिळत नाही. त्यामुळे दुप्पट भाडे मोजून प्रवाशांना नाईलाजाने दलालांचा आधार घ्यावा लागत आहे.
कोकण रेल्वे दलालांसाठी कमावण्याचे मुख्य साधन बनले आहे. गणेशोत्सव, होळी, उन्हाळ्याची सुट्टी या सीझनमध्ये तर दलालांची लाखोंची कमाई होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मध्य व पश्चिम रेल्वेने अनेक विशेष गाड्या सोडल्या आहेत. पण नियमित गाड्यांप्रमाणे या गाड्यांचे आगाऊ आरक्षणही अवघ्या एक ते दोन मिनिटात फुल झाले. ज्यांनी दलालाना आगाऊ आरक्षण करण्यास सांगितले होते अशांना हमखास तिकिटे मिळाली. पण जे प्रवासी रात्रीपासून आरक्षण केंद्राबाहेर रांगा लावून बसले होते त्यांना तिकिटेच मिळाली नाहीत. विशेष म्हणजे ऑनलाईन तिकिटेही मिळाली नाहीत. त्यामुळे आगाऊ आरक्षणात 100 टक्के घोळ होत असल्याची खात्री आता चाकरमान्यांना पटली आहे. पण न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
गेल्या काही वर्षात रेल्वे प्रवासी संघटना अनेक स्थापन झाल्या आहे. या संघटनेच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्यात येतात. पण याकडे रेल्वे प्रशासनाकडून नेहमी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. सर्वसामान्यांना आगाऊ आरक्षण मिळत नसताना, दलालांना हमखास आरक्षण कसे मिळते, असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडला आहे. यामागे मोठे गौडबंगाल असून याला गेल्या अनेक वर्षात रेल्वे प्रशासनही आळा घालू शकलेली नाही. रेल्वेतील काही भ्रष्ट अधिकार्यांच्या संगनमताने दलालाना आगाऊ आरक्षण मिळत असल्याचा आरोपही केला जात आहे. आगाऊ आरक्षणात मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडले असून हे थांबले नाही तर, चाकरमान्यांची लूट होतच राहणार आहे.
एखाद्या एक्सप्रेस गाडीच्या स्लीपर, एसी थ्री टियर, टू टियर भाड्याच्या दुप्पट दलाली वसूल करण्यात येते. उदाहरणार्थ एका प्रवाशाच्या स्लीपरचे तिकीट 500 रुपये असेल तर, 500 रुपये दलाली द्यावी लागते म्हणजेच एक तिकीट 1 हजार रुपयांवर जाते.
साटेलोटे आहे का? - गणपतीचे तिकीट कोकणातील चाकरमान्यांना मिळत नाही, बुकींग सुरू झाल्यानंतर 2 मिनिटांमध्ये रेल्वे रिग्रेट होतात,मात्र तेच तिकीट दलाल चढ्या दराने प्रवाशांना विकतात, मग त्यांना तिकीट कोठून मिळते? यामध्ये तिकीट विक्रेते आणि रेल्वे प्रशासन यामध्ये साटेलाटे आहे का ? अशी शंका प्रवाशांना येत आहे.
यशवंत जड्यार, सेक्रेटरी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई
दलालांची नावे द्या, आम्ही कारवाई करू - तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची एकही तक्रार आलेली नाही. जर तिकिटाचा काळाबाजार करणार्या दलालांची नावे आपल्याकडे असतील तर, ती आपण द्यावीत. आम्ही कारवाई करू
स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे