ओरोस : ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटामधील छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहिन माहिती देऊन समस्त शिवप्रेमीच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदू जनजागरण समितीने जिल्हाधिकार्यांना दिले आहे
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे हे निवेदन दिले, सकल हिंदू शिवप्रेमी संघटना, दुर्ग मावळा सकल हिंदू संघटना आणि हिंदूजन जन जागृती संघटना यांनी हे एकत्रित निवेदन दिले. श्रीकृष्ण शिरोडकर, जयदीप सावंत, भाऊ सामंत, किरण धावले, किरण परब, किशोर सरनोबत, उमेश राणे, संपदा राणे, अभिषेक रेंगे, रवींद्र परब, गणेश चव्हाण, चंदशेखर पुनाळेकर, अविनाश पराडकर, लवू महाडेश्वर, रमाकांत नाईक, गणेश कारेकर, उदय आईर, उदय पवार आदीसह उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांच्या समावेशाबाबत चुकीची माहिती दाखविण्यात आली आहे. तसेच रायगडावर महाराजांनी मशिद उभारली होती, असे काही प्रसंग ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे, तथ्यहिन व मूळ ऐतिहासिक नोंदीशी विसंगत आहेत. हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याच्या हेतूपुरस्सर प्रयत्नाचे उदाहरण आहे. कोणत्याही अधिकृत बखरींमध्ये, ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये, पेशवाई, इंग्रज वा मुघल काळातील अभिलेखामध्ये या गोष्टींचा उल्लेख नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. तुर्क फौजेत ठेविलीयाने जय कैसा मिळतो (संदर्भ: शिवकालीन पत्रे) या पत्रावरून स्पष्ट होते की, छत्रपती शिवाजी महाराजानी तुर्क, मुचल। आदिलशाही व निजामशाहीसारख्या परकीय व आक्रमकांना कधीही सोबत घेतले नाही. त्यांच्याशी कोणतीही तडजोड केली नाही. हा चित्रपट हिंदूमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास हा जनतेच्या श्रद्धेचा विषय असून, त्याचे हेतूपुरस्सर विकृतीकरण जनक्षोभ निर्माण होण्यास, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारण ठरू शकते. आपण या प्रकरणी तातडीने यात हस्तक्षेप करून ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.