केर : येथे रस्त्यावर बसलेला बिबटा. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Ker Village Leopard Sighting | केर गावात भर रस्त्यावर बिबट्याचे ठाण!

Villagers Fear | मुक्त वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : घरी परतत असताना भर रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने एका युवकाची भीतीने गाळण उडाली. काही वेळापूर्वीच गावातील एका गायीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. शुक्रवारी सायंकाळी केर गावात ही घटना घडली.

केर गावातील ओंकार देसाई हे कारने शुक्रवारी रात्री 8 वा. च्या सुमारास घरी परतत होते. दरम्यान त्यांना मुख्य रस्त्यावर एक बिबटा दिसून आला. त्याला पाहून ओंकार देसाई यांनी कार जागीच उभी केली व बिबट्याची छबी मोबाईलमध्ये कैद केली; मात्र बिबट्या रस्त्यावर शांत बसून होता.

तत्पूर्वी सायंकाळी याच गावातील शेतकरी मंगेश शांताराम देसाई यांच्या गायीवर एका वाघाने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेची चर्चा सुरू असतानाच रात्री ओंकार देसाई यांना बिबटा दिसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुचाकीस्वारांमध्ये भीती

गावात रात्री उशिरापर्यंत दुचाकीस्वारांची ये-जा सुरू असते. एकीकडे हत्तीचे संकट गडद होत असताना दुसर्‍या बाजूने बिबट्याचे संकट उभे टाकले आहे. बिबटा मुख्य रस्त्यावरच दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे ग्रामस्थ रात्री बाहेर पडण्यासही धजावत नसल्याचे समजते.

बिबटा वन्य अधिवासातील की सोडलेला?

बिबट्याचा वावर पाहता तो नैसर्गिक अधिवासातून भटकून आलेला आहे की वन विभागाने कुठेतरी पकडून येथे सोडलेला आहे, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. विशेष म्हणजे, हा बिबटा अतिशय आक्रमक असून तो भर रस्त्यावर सहजपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामस्थ, शेतकर्‍यांना भयमुक्त करण्याची मागणी

घटनेनंतर ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी वन अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. वन विभागाने कर्मचारी पाठवण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात अजून ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामस्थांना भयमुक्त करण्यासाठी वन विभागाकडून तत्काळ पावले उचलली गेली पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT