कणकवली ः कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी रात्री 11 वा. च्या सुमारास लोकेश बिस्ट (22, मुळ रा. नेपाळ, सध्या रा. कणकवली) याच्यावर शाब्दिक बाचाबाचीतून एका अज्ञात संशयिताने शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत हातातील चाकूने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असून बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
कणकवलीत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेपाळी कामगार काम करतात. मंगळवारी रात्री 11 वा. च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यातील काहीजण एकत्र आले होते. जखमी लोकेश बिस्ट याचा मित्र छोटू याने लोकेश याला फोन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्याला बोलवून घेतले. लोकेश त्याठिकाणी आल्यानंतर एका अज्ञात पुरूषाने हातात चाकू घेत लोकेश याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत चाकूने डोक््यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गंभीर जखमी लोकेश याला उपचारासाठी प्रथम कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणि तेथून अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कणकवलीचेपोलिस उपअधीक्षक घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे, सहा.पोलिस निरीक्षक नागेश चिकणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिस पोहचण्यापूर्वीच हल्लेखोर अंधाराचा फायदा घेवून पसार झाला होता. मिळालेल्या माहितीनूसार लोकेश याचा मित्र छोटू हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असताना संबंधित हल्लेखोराने त्याला पकडून ठेवून त्याचा मित्र लोकेश याला फोन करून बोलवून घेण्यास सांगितले. छोटूने लोकेशला बोलवून घेतल्यानंतर तो अज्ञात हल्लेखोर आणि लोकेश यांच्यात काही बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि हल्लेखोराने लोकेश याच्यावर चाकूने वार केला आणि तो पळून गेला. या घटनेमागे संबंधित हल्लेखोर आणि जखमी लोकेश यांच्यामध्ये पूर्वी काही वाद झाल्याची पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे. मात्र त्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक नागेश चिकने करत आहेत.