

यवतमाळ : घाटंजी मार्गावरील निर्माणाधीन रेल्वे ट्रॅक परिसरात सोमवारी (दि. ५) सकाळी एका ५६ वर्षीय व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जानराव विठोबा मैद (रा. सावरगड) असे मृताचे नाव असून, अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरणी एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून जुन्या रेकॉर्डवरील गुन्हेगारानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
मृत जानराव मैद हे यवतमाळ येथील एका डॉक्टरकडे घरकामाला होते. ते दररोज सावरगड ते यवतमाळ असा सायकलने प्रवास करत असत. मात्र, रविवारी (दि. ४) रात्री ते कामावरून घरी परतलेच नाहीत. पती घरी न आल्याने चिंतेत असलेल्या त्यांच्या पत्नी गीताबाई मैद या सोमवारी सकाळी पतीचा फोटो घेऊन परिसरात शोध घेत होत्या. शोध घेत असतानाच बोथगव्हाण येथील काही नागरिकांनी त्यांना रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह पडला असल्याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार गीताबाईंनी घटनास्थळी धाव घेतली असता, समोर आपल्या पतीचा रक्ताळलेला मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जानराव यांचा खून धारदार शस्त्राने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, रविवारी रात्री जानराव मैद यांच्यासोबत प्रफुल्ल गजानन साखरकर (रा. चापडोह) हा युवक दिसला होता. प्रफुल्ल हा पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेला गुन्हेगार आहे. पोलिसांनी वेगाने हालचाली करत प्रफुल्ल साखरकर याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
मृत जानराव यांची पत्नी गीताबाई मैद यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी प्रफुल्ल साखरकर याच्याविरुद्ध खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला आहे. हा खून कोणत्या कारणातून झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.