कणकवली : कळसुली-हर्डी फाट्याने कनेडीच्या दिशेने टेम्पोतून होत असलेली गुरांची वाहतूक समजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री 9.45 वा. च्या सुमारास कनेडी बाजारपेठ येथे कनेडी-फोंडाघाट मार्गावर ही वाहतूक रोखली. या अवैध गुरे वाहतूक प्रकरणी भुदरगड येथील दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत टेम्पोसह एक म्हैस, एक गाय आणि म्हशीचे रेडकू असा मिळून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबतची फिर्याद चैतन्य मनोहर नाईक (रा.हळवल, परबवाडी) यांनी कणकवली पोलिसांत दिली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा.च्या सुमारास ते त्यांचा मित्र यश शिर्के याला हर्डी येथे सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी हर्डी फाटा येथे सफेद रंगाच्या टेम्पोतून कनेडीच्या दिशेने गुरांची वाहतूक होताना त्यांना दिसली.
यावेळी चैतन्य यांनी त्यांचा मित्र सिध्देश घाडीगांवकर (रा.सांगवे) याला फोन करुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सिध्देश याने कनेडी येथे येवून ही बाब सांगितली. साधारणपणे 9.45 वा.च्या सुमारास कनेडी बाजारपेठ येथे फोंडाघाट मार्गावर ग्रामस्थांनी गुरे वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोतून दहा हजाराची एक काळ्या रंगाची पाच वर्षाची म्हैस, 500 रु. किमतीचे म्हशीचे रेडकू आणि 12 हजार रु.किमतीची शिंगे वळलेली एक गाय आढळून आली.
या गुरांची अवैधपणे वाहतूक होत असल्याचे समजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी कणकवली पोलिस स्टेशनला खबर दिली. याप्रकरणी पोलिसांनी विजय बाबाजी चौगले (43) आणि अंकुश तातोबा चौगले (43, दोन्ही रा.थड्याचीवाडी, भुदरगड, कोल्हापूर) यांच्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम आणि जनावरांची विनापरवाना वाहतूक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पोसह जनावरे ताब्यात घेण्यात आली. अधिक तपास कनेडी दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.