

कणकवली : कणकवली बाजारपेठेतील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांबाबत सोमवारी मुख्याधिकारी गौरी पाटील आणि पोलिस निरीक्षक मारूती जगताप तसेच व्यापारी संघाच्या पदाधिकार्यांनी संयुक्तपणे पाहणी करत संबंधित दुकानदारांना सूचना देण्यात आल्या. वाहतुकीस अडथळा होणार नाही यासाठी गटाराच्या आतमध्ये दुकाने लावा. रस्त्यावर अतिक्रमण असल्यास ते हटवा अशा सूचना देण्यात आल्या.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शहरातील समस्यांच्या आढावा बैठकीत कणकवली व्यापारी संघाच्या पदाधिकार्यांनी याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस निरीक्षक आणि मुख्याधिकार्यांना याबाबत पाहणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी या बाजारपेठेतील अतिक्रमणांची पाहणी करण्यात आली.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, विलास कोरगावकर, राजेश राजाध्यक्ष, शेखर गणपत्ये, यांच्यासह न.पं. कर्मचारी उपस्थित होते.
कणकवलीतील मुख्य चौकापासून रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी करत मुख्याधिकारी आणि पोलिसांनी सूचना दिल्या.
पटवर्धन चौकापासून पटकीदेवी पर्यंत तसेच तेलीआळीमध्ये ही पाहणी करण्यात आली.दरम्यान, सोमवारी कारवाईच्या शक्यतेने अनेक दुकानदारांनी आपली दुकाने गटाराच्या आतमध्ये लावल्याचे चित्र होते. गटाराच्या आतमध्येच दुकाने लावा. रस्त्यावर दुकाने लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशाही सुचना देण्यात आल्या. दरम्यान बाजारपेठेतील पार्किंगबाबतही पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.